आशिष गावंडे, अकोला: ग्राम बाभुळगाव येथे एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीला बेदम मारहाण केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची बाब शवविच्छेदन अहवालात उघड झाली हाेती. या प्रकरणाला धक्कादायक कलाटणी मिळाली असून शहर पाेलिस उपअधीक्षक सतीष कुलकर्णी यांनी सखाेल तपास करण्याचे निर्देश दिल्यानंतर ‘त्या’चिमुकलीची हत्या आई, वडीलांनीच केल्याचा उलगडा झाला आहे. याप्रकरणी दाेघांना अटक करण्यात आली असून त्यांना १४ जुलै पर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात आली आहे.
अकोला ते मुर्तीजापुर राष्ट्रीय महामार्गालगतच्या बाभुळगाव येथील एका अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीला तिला बेदम मारहाण करण्यात आली हाेती. ३० जून रोजी मुलीला उलट्या झाल्याने तिच्या कुटुंबियांनी तिला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची तपासणी केली असता, तीला मृत घोषित केले हाेते. या प्रकरणामध्ये एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली होती. परंतु मुलीच्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी ७ जुलै राेजी खुनाचा गुन्हा दाखल केला हाेता.
‘डीवायएसपीं’नी दिली गती
चिमुकलीच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा, कुटुंबियांची संशयास्पद वागणूक तसेच शवविच्छेदन अहवाल आदी बाबी लक्षात घेता शहर पाेलिस उपअधीक्षक सतीष कुलकर्णी यांनी एमआयडीसी पाेलिसांना तपासाची दिशा दिली. त्यानंतर पाेलिसांनी मुलीचे वडील अब्दूल वसीम अब्दूल हकीम व आई रूखसाना परवीन अब्दूल वसीम दाेन्ही रा.बाभुळगाव यांच्याविरूध्द हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मुलीचा गळा आवळून हत्या केल्याची माहिती आहे. दाेन्ही आराेपींना न्यायालयात सादर केले असता, त्यांना १४ जुलै पर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात आली आहे.
अनेक प्रश्न अनुत्तरीत
अकरा वर्षीय चिमुकल्या मुलीला मरेपर्यंत मारहाण का करण्यात आली? कुटुुंबियांनी गळा आवळून स्वत:हून रुग्णालयात भरती करुन पाेलिसांची दिशाभूल का केली? आदी अनेक प्रश्न अनुत्तरीत असून या प्रश्नांची उत्तरे एमआयडीसी पाेलिसांना मिळतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.