- राजेश शेगोकारअकोला : कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी तब्बल ७३ दिवस लॉकडाऊननंतर जून महिन्यात ‘अॅनलॉक’ ची प्रक्रिया सुरू केली अन् पुनश्च हरिओम म्हणत नागरिकांवरील बंधने शिथिल केली. बाजारपेठेत लगबगही वाढली, त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली; मात्र हे सर्व होत असताना कोरोनाचे संकटही अनलॉक झाले. जुलै महिन्यात अकोला शहराने कोरोनाला बांधून ठेवण्यात यश मिळविले; पण ग्रामीण भाग पेटला अन् पाहता-पाहता कोरोनाचा वणवा पुन्हा एकदा जिल्हाभर पसरला असून, आता ‘हे राम’ म्हणत डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे; पण हे संकट संपलेले नाही.अकोल्याची स्थिती अतिशय चिंताजनक टप्प्यावर पोहोचली आहे. सप्टेंबर महिन्यात दररोज सरासरी दोन मृत्यू अन् शंभरावर रुग्ण यामुळे आता शहरात नव्या रुग्णांसाठी खाटाही शिल्लक नाही. आॅक्सिजनच्या आणीबाणीमुळे काही काळ रुग्णांसह प्रशासनाचाही श्वास कोंडला होता. सध्या तात्पुरते जीवनदान मिळाले असले तरी प्रश्न कायमच आहे. या समस्येचे उच्चाटन करण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनला विरोध करणारे आता पुन्हा लॉकडाऊनची भाषा बोलू लागले आहेत; मात्र ते आता शक्य नाही. मुळातच लॉकडाऊन हा एक उपाय होता. तो एकमेव उपाय नव्हता, त्यामुळे आता पुन्हा सारे बंद करून घरात बसणे शक्यच नाही. फक्त नागरिकांमध्ये वाढलेली बेफिकीर वृत्ती कमी करण्यासाठी प्रत्येकानेच वैयक्तिक जबाबदारी घेण्याची नितांत गरज आहे.बाजारपेठेत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. मास्क लावण्याबाबत कोणी गंभीर नाही अन् महापलिका व जिल्हा प्रशासनही दंडात्मक कारवाईचा फतवा काढून मोकळी झाली आहे. त्यामुळे कुणावरही कारवाईचा धाक नाही. अशा स्थितीत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हेच धोरण प्रत्येकाचे असले पाहिजे. सध्याच बुलडाणा, वाशिम अन् हिंगोलीचाही ताण अकोल्यावर येऊन पडला आहे. आरोग्य यंत्रणेची होणारी दमछाक पाहून अनेक रुग्ण आपले दुखणे लपवित आहेत, श्वास घेण्यास एकदमच अडचण झाल्यावर रुग्णालय गाठत असल्याने या रुग्णांचा जीव वाचविणे आरोग्य यंत्रणेलाही शक्य होत नाही. असे असले तरी बरे होणाऱ्याचे प्रमाणही लक्षणीय आहे, हे विसरता कामा नये. त्यामुळे कोरोनाच्या संकटावर मात करायचीच असेल अन् अर्थचक्रालाही गती द्यायची असेल तर नियमांचे पालन, अन् वेळीच उपचार या दोन सूत्राची प्रत्येकाने अंमलबजावणी केली पाहिजे.येणाºया काळात कोरोनासोबतच राहावे लागणार आहे अन् ज्यांना अजूनही कोरोना म्हणजे थोतांड वाटते अशा महाभागांनी कोरोनाचा शिरकाव झालेल्या कुटुंबाशी संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घ्यावे. उपचाराने कोरोना बरा होतोच; पण प्रतिबंधात्मक नियम पाळले तर तो दूरही राहतो, हे सुद्धा लक्षात घ्यावे लागेल. त्यामुळे अजूनही ‘हे राम’ म्हणत डोक्यावर हात ठेवला असेल तर तो काढा अन् निमयांचे बंधन हातावर बांधा. अन्यथा ‘राम नाम सत्य है’ हे म्हणायलाही शेवटच्या प्रवासात कोणी नसते, हे चित्र आपण पाहतच आहोत.