अकोला: मोर्णा नदीच्या पात्रात उगवलेली जलकुंभी काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने तब्बल चौदा लाख रुपयांची तरतूद करत दोन टप्प्यांत निविदा काढली. संबंधित कंत्राटदाराने नदी पात्रातून जमा केलेल्या जलकुंभीची दुसर्या ठिकाणी विल्हेवाट लावण्याची गरज असताना चक्क नदी पात्रातच जलकुंभी जाळण्याचे प्रकार होत आहेत. अकोलेकरांना वृक्ष संवर्धनाचे आवाहन करणार्या मनपाकडून पर्यावरणाची ऐशीतैशी केली जात असल्याची टीका होत आहे.मोर्णा नदीच्या पात्रात दरवर्षीप्रमाणे यंदाही जलकुंभी उगवली. हिंगणा परिसरापासून ते मुख्य गणेश घाट, ते दगडी पूल ते रेल्वे पुलापर्यंत उगवलेल्या जलकुंभीमुळे नदीकाठच्या रहिवाशांची झोप उडाली. जलकुंभीमुळे नदीतील घाण पाण्याचा निचरा होत नसल्याने डासांची पैदास वाढली. परिणामी नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले. यावर उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने जलकुंभी काढण्याची निविदा प्रकाशित केली. याकरिता चौदा लाख रुपये किंमत निश्चित करण्यात आली. पहिल्या टप्प्यात सिटी कोतवाली ते दगडी पूल ते रेल्वे पुलापर्यंंतची जलकुंभी काढण्यात आली. आता दुसर्या टप्प्यात अनिकट परिसर ते हिंगणा परिसरापर्यंत जलकुंभी काढण्याच्या कामाला सुरुवात झाली. निमवाडी परिसरात नदीपात्रातून जमा केलेल्या जलकुंभीची इतर ठिकाणी विल्हेवाट लावणे सहज शक्य असताना नदीच्या काठावर जलकुंभीचे ढीग जमा करण्यात आले. उन्हामुळे वाळल्यानंतर जलकुंभीच्या ढिगार्याला पेटवून देण्याचे काम होत आहे. या प्रकारामुळे पर्यावरणाचा र्हास होण्यासोबतच प्रदूषणाला हातभार लागत असल्याने मनपाच्या धोरणावर अकोलेकर तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
नदीपात्रात जाळली जलकुंभी
By admin | Published: May 23, 2016 1:50 AM