अकोला: जिल्हय़ातील महसूल वसुलीचा आढावा घेत, जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत निवड करण्यात आलेल्या गावांमधील प्रस्तावित कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी मंगळवारी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित बैठकीत, विभागीय आयुक्तांनी जिल्हय़ातील महसूल वसुलीच्या कामाचा आढावा घेतला. त्यामध्ये प्रामुख्याने महसूल वसुलीबाबत यावर्षी जिल्हय़ाचे उद्दिष्ट आणि त्या तुलनेत आतापर्यंंत झालेली महसूल वसुलीचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला. जिल्हय़ातील रेतीघाटांच्या लिलावातून अपेक्षित महसूल व त्या तुलनेत प्राप्त महसूल, गौण खनिज अवैध उत्खनन व वाहतुकीसंदर्भात दंडापोटी महसूल वसुली, जमीन महसूल, करमणूक कर वसुली व इतर महसूल वसुलीच्या कामाची माहिती विभागीय आयुक्तांनी घेतला. यासोबतच जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्हय़ातील कामांचा आढावा त्यांनी घेतला. त्यामध्ये गतवर्षी जिल्हय़ात निवड करण्यात आलेल्या २00 गावांमधील कामांच्या आराखड्यातील उर्वरित कामे उपलब्ध निधीतून तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच यावर्षी जिल्हय़ात निवड करण्यात आलेल्या गावांमधील कामांसाठी कामांची अंदाजपत्रके तयार करून, कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त राजुरकर यांनी अधिकार्यांना दिल्या. जिल्हय़ातील शेतकरी आत्महत्या, टंचाई निवारणाच्या उपाययोजना, महत्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व इतर कामाचा आढावादेखील विभागीय आयुक्तांनी घेतला. यावेळी प्रामुख्याने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो ) प्रमोदसिंह दुबे, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एम. मालपुरे यांच्यासह जिल्हय़ातील महसूल व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
‘जलयुक्त शिवार’ची कामे तातडीने मार्गी लावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2016 1:40 AM