अकोला: डॅडी देशमुख स्मृती पहिल्या लघुचित्रपट महोत्सवाचे पहिले पारितोषिक आशीष मोयल दिग्दर्शित ‘जरीवाला आसमान’ या लघुचित्रपटाने पटकाविले. द्वितीय पारितोषिक सुभाष मकसारा दिग्दर्शित ‘नजा का आलम’आणि तृतीय पारितोषिक चेतन पाटील दिग्दर्शित ‘मसानखायी’ पटकाविले.प्रमिलाताई ओक सभागृह येथे गुरुवारी एकदिवसीय डॅडी देशमुख लघुचित्रपट महोत्सवाचे आयोजन केले होते. उद्घाटन कार्यक्रमानंतर १५ लघुचित्रपट प्रेक्षकांना दाखविण्याता आले. डॉ. राजेश देशमुख निर्मित डॅडी...वुई मिस यू आणि मोर्णा स्वच्छता अभियान हे दोन चित्रपट दाखविण्यात आले; मात्र हे दोन्ही चित्रपट स्पर्धेत नव्हते. उत्कृष्ट दहा चित्रपटांचे परीक्षक विराट जाखड, डॉ. मनोज उज्जैनकर (नागपूर), अनंत देव व संजय शर्मा यांनी परीक्षण केले. जरीवाला आसमान, नजा का आलम आणि मसानखायी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक पटकाविले. वैदर्भीय पाच चित्रपटांना विशेष उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.बक्षीस वितरण सोहळा महापौर विजय अग्रवाल, प्रा. तुकाराम बिरकड, प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ, मधू जाधव, प्राचार्य रामेश्वर भिसे, डॉ. संजय खडक्कार, जयंत मसने, ऐश्वर्या राजेश, अस्मिता बोरकर, स्नेहा सावजी, प्रणाली सातारकर, सुदेशना नावकार, सागर साळुंके, किशोर बळी, अमोल टाले, सौरभ ठाकरे, स्वप्निल बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी सह्यांद्री ग्रुपच्या कलावंतांनी समूहनृत्य सादर केले. लघुचित्रपट महोत्सवाला वैदर्भीय कलावंतांची मांदियाळी होती. कार्यक्रमाला अनुराग मिश्र, प्रा. श्रीराम पालकर, विद्या बनाफर, दीपक गोल्डे, प्रा. अशोक भराड, प्रा. दिलीप अप्तुरकर उपस्थित होते.