अकोला - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक उत्तम जाधव यांच्या बदलीला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण (मॅट) कडून सोमवारी स्थगिती मिळाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात गत एक वर्षांंपूर्वीच रुजू झालेले जाधव यांनी नियमानुसार तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केलेला नसताना त्यांची बदली झाल्याने त्यांनी या विरोधात मॅटच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली असून, त्यांच्या बदलीला स्थगिती मिळाली आहे. जाधव यांनी वर्षभराच्या कालावधीत केलेल्या कामगिरीचा अहवाल मॅटसमोर मांडला. वर्षभरात केलेल्या कारवायांचा लेखाजोखाच त्यांनी सादर केला. कामगिरी चांगली असताना मुदतीआधीच बदली कशी करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला. मॅटने त्यांचे म्हणणे ग्राह्य धरून बदली आदेशास स्थगिती दिली. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे , पोलीस उपअधीक्षक उत्तम जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागात रुजू होऊन केवळ एक वर्षाचा कालावधी झाला असताना बदली करण्यात आली असल्याचे सांगीतले. एका पदावर रुजू झाल्यानंतर नियमानुसार तीन वर्ष बदली करण्यात येत नाही. मात्र, एका वर्षातच बदली करण्यात आली असून, या विरोधात मॅटकडे याचिका दाखल केली होती. सुनावनीनंतर बदलीला स्थगिती मिळाली.
उत्तम जाधव यांच्या बदलीला ‘मॅट’कडून स्थगिती
By admin | Published: June 09, 2015 2:28 AM