अकोला : शहराच्या कानाकोपर्यात घाणीने साचलेल्या नाल्या-सर्व्हिस लाईन, डासांची वाढलेली पैदास व दूषित पाण्यामुळे कावीळ, हिवताप व डेंग्यूची साथ पसरली असून, अख्खे शहरच आजाराने फणफणत आहे. घराघरांत लहान मुलांपासून ते वयोवृद्ध नागरिकांना आजार व तापाने हैरान केले असताना महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने झोपेचे सोंग घेतले आहे. कर्तव्याची जाण असल्याचा बागुलबुवा करणारे मनपाचे वरिष्ठ अधिकारी अकोलेकरांच्या आरोग्याप्रती अजिबात जागरूक नसल्याचा आरोप होत आहे. अख्ख्या शहरात कावीळ, हिवपात व डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले असून अकोलेकरांचा जीव धोक्यात आला आहे. सवरेपचार रुग्णालयासह मोठे खासगी हॉस्पिटल असो व गल्ली बोळातील ह्यक्लिनिकह्ण रुग्णांच्या गर्दीने खचाखच भरली आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी जागा अपुरी पडत असल्यामुळे काही डॉक्टर घरी जाऊन रुग्णांवर उपचार करीत असल्याची भीषण परिस्थिती आहे. या साथरोगांना आळा घालण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य यंत्रणेसह महापालिक ा प्रशासनाची असताना, दोन्ही आरोग्य यंत्रणा नागरिकांच्या आरोग्याप्रती कमालीच्या निष्क्रिय असल्याचे चित्र आहे. अकोलेकरांच्या आरोग्याला केवळ अस्वच्छता कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. मुख्य रस्त्यांसह सार्वजनिक ठिकाणे, प्रत्येक प्रभागातील नाल्या, सर्व्हिस लाईन घाणीने गच्च भरल्या आहेत. जागा दिसेल तिथे गाजर गवत, काटेरी झुडपे वाढली असून, सांडपाण्यामुळे डासांची पैदास वाढली आहे. मनपाची वैद्यकीय आरोग्य यंत्रणा, आरोग्य अधिकारी, साथ रोग अधिकारी, सफाई कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक आजच्या घडीला नेमकी कोणती कामे करीत आहेत, याचा आढावा घेण्याची तसदी मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर, प्रभारी उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाणे यांना किंचित नसल्याची वस्तुस्थिती आहे.
** डेंग्यूने शिवणीत मुलाचा मृत्यू
शिवणी - जिल्हय़ात सद्यस्थितीत साथरोगांचे थैमान सुरू असून, डेंग्यू व डेंग्यूसदृश आजारानेही नागरिक हैरान झाले आहेत. जिल्हय़ात आतापर्यंत डेंग्यूसदृश आजाराने चार जणांचा बळी घेतला असून, सोमवारी शिवणी खदान येथील एका १५ वर्षीय मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाला. शिवणी खदान येथील रहिवासी शेख सलीम यांचा मुलगा शेख परवेज याला अचानक ताप आला. त्यानंतर त्याला तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.या ठिकाणी उपचार सुरू केल्यानंतर मुलाच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला एका मोठया रुग्णालयात हलविण्यात आले. १७ सप्टेबर रोजी त्याची प्रकृती चिंताजनक झाली. त्यानंतर काही तासातच त्याचा मृत्यू झाला. शेख परवेज याचा डेंग्यूसदृश आजाराने बळी घेतला असून, त्याच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.