संजय उमक
मूर्तिजापूर : तालुक्यातील २००७ ला रखडलेल्या काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पास अलीकडेच सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. ही मान्यता केवळ सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या प्रयत्नामुळेच मिळाली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. या संदर्भात त्यांची एक व्हिडिओ चित्रफीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्हायरल केली असून, त्यामध्ये मंत्री पाटील यांनी काटेपूर्णा बॅरेजच्या मान्यतेवरून सुरू असलेल्या श्रेयवादावर पडदा टाकला आहे. तालुक्यातील मंगरुळ कांबे प्रकल्प उभारणीसाठी ३१ ऑगस्ट २००७ ला प्रस्ताव पाठविण्यात आला होता. तो मंजूर होऊन त्यासाठी ९६ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला होता. तेव्हापासून हा प्रकल्प अर्धवट अवस्थेत असून, आता पुन्हा २४ मार्च रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ५३३ कोटी ८१ लाख रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास १३ गावांमधील चार हजार २८१ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील ६ फेब्रुवारी रोजी आले असता या प्रकल्पाबाबत त्यांनी त्यावेळी प्रकल्प पूर्ण करून घेण्यासाठी आपण जातीने लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिले होते. तेच आश्वासन पाळले गेल्याची चर्चा आहे. मंत्री पाटील यांच्या म्हणण्यानुसार तालुक्यातील व जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी, संग्राम गावंडे, रवी राठी यांनी व जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलेला पाठपुराव्याने ५३३ कोटींची मान्यता आम्ही दिलेली आहे. ही बाब अनेक वर्षे प्रलंबित होती. मागच्या सरकारने गती देणे आवश्यक होते; परंतु तसे झाले नाही. दरम्यान, सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी सोशल मीडियावर प्रचंड पत्रकबाजी सुरू होती. मंत्री पाटील यांच्या वक्तव्याने या श्रेयवादावर तूर्तास पडदा पडला आहे.