वयाच्या विसाव्या वर्षापासून पंढरीची वारी करत आलो आहे. पण गेल्या दोन वर्षापासून वारीत खंड पडला आहे. आषाढी आली की मन पांडुरंगाच्या भेटीसाठी कासावीस होते. दरवर्षी आम्ही गावातून ७० ते ८० वारकरी जात होतो. यावर्षी जाता आले नसले, तरी मन मात्र पंढरीतच आहे. डोळ्यासमोर सतत पांडुरंगाचे सुंदर रुपडे आणि वारकऱ्यांचा आनंदसोहळा तरळत राहतो. कर्नाटकातील धारवाड, बेळगाव, मराठवाड्यातील वारकरी सख्यांच्या भेटीसाठी मन आतुर झाले आहे. कोरोना महामारीमुळे वारी चुकत असल्याची खंत मनात आहे. या विश्वातून काेरोनाचा नायनाट करावा, अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना आहे. आषाढी हुकली, तरी कार्तिकीला नक्कीच पांडुरंगाचे रूप याचि देही याचि डोळा पाहता यावे, अशी आस मनी लागून आहे.
- रमेश महाराज इस्तापे, पारस
००००००००००
‘मनी लागलीया आस, कधी भेटसी जीवास,’ अशी स्थिती झाली आहे. आषाढी आली की मन पांडुरंग भेटीसाठी आतुर होते. गेल्यावर्षी पंढरीला जाता आले नाही. यावर्षी तरी जाता येईल, अशी आस मनाला लागून होती. परंतु, यंदाही पांडुरंगाची भेट नशिबी नाही. कोरोना महामारीने पांडुरंगासोबत वारकऱ्यांची ताटातूट झाली आहे. आजही पंढरपुरातील सोहळा डोळ्यासमोर उभा राहतो. आषाढी एक दिवसावर आली आणि आपण पंढरीला जाऊ शकत नाही, यामुळे मनाला हुरहूर वाटत आहे. येथूनच पांडुरंग चरणी माथा टेकतो. जयहरी.
- मदन महाराज राठोड, चिंचखेड