आशिष गावंडे/अकोला:शहरातून बाळापूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या हॉटेलमधील लग्न समारंभातून एका महिलेची पर्स लंपास केल्याची घटना २९ जानेवारी राेजी समाेर आली आहे. पर्समध्ये असलेल्या अडीच लाख रूपयांचे सोन्याचे दागिणे व ५० हजार रूपयांच्या रोख रकमेवर चाेरट्यांनी डल्ला मारला. चोरीची ही घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेत डाबकी रोड पोलिसांनी तपासाची सुत्रे फिरवली आहेत.
जुने शहरातील डाबकी रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गालगच्या हॉटेल तुषारमध्ये लग्न समारंभ सुरू असताना चोरट्यांनी एका महिलेची सोन्याचे दागिने व रोख रक्कम भरलेली पर्स लंपास केली. लग्न समारंभात सदर महिलेच्या पर्सवर अज्ञात चोरटे पाळत ठेऊन होते. त्या महिलेने खुर्चीवर पर्स ठेवल्यानंतर ती बाजूला होताच चाेरट्यांनी क्षणाचाही विलंब न करता पर्स हातामध्ये घेऊन पाेबारा केला. या घटनेची माहिती डाबकी रोड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर जुनघरे यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द भादंविच्या कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.