खामगाव : सतत वादग्रस्त होऊन रखडलेल्या जिगाव प्रकल्पाला शुक्रवारी सकाळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भेट देत जिगाव प्रकल्पाचे वास्तव समजून घेतले. प्रकल्पस्थळी ग्रामस्थांशी संवाद साधल्यावर त्यांनी 'लोकमत' शी बोलताना जिगाव प्रकल्पातील गैरव्यवहार लवकरच उघड करणार असल्याचा गौप्यस्फोट केला. सिंचन घोटाळ्यांविरुद्ध आवाज उठविणार्या व आता महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर केलेल्या विविध आरोपांमुळे चर्चेत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास त्यांनी जिगाव प्रकल्पाच्या मातीभिंत व पाया बांधकामाची पाहणी केली. यावेळी उपस्थित प्रकल्पग्रस्त व काही सामाजिक कार्यकर्ते यांना प्रकल्पाच्या कामाबाबत विचारणा करून, पुनर्वसन रखडल्याने व उपसा सिंचनाच्या कामांवर कोट्यवधीचा खर्च झाल्याचे समजताच त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. पुढील महिन्यात पुन्हा एकदा जिगाव प्रकल्पाच्या सिंचन योजना व अन्य कामांची पाहणी करून त्यामधील गैरव्यवहार बाहेर काढणार असल्याची ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली. जिगाव प्रकल्पाच्या पाहणीनंतर या चमूने कुर्हा-वडोदा-इस्लामपूर या सिंचन प्रकल्पाच्या उपसा सिंचन योजनेच्या कामाची व याकरिता पाणी साठविण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या माती धरणाची पाहणी केली. तापी खोरे पाटबंधारे मंडळांतर्गत येत असलेल्या या प्रकल्पासाठी पाणी साठविण्यासाठी माती धरणाचे काम कासवगतीने होत असताना उपसा सिंचन पाइप खरेदी व इतर कामे तसेच जमिनीत पाइप गाळण्याचे काम झाल्याने आश्चर्य व्यक्त केले. येत्या दहा दिवसात या सिंचन योजनेबाबत पत्रकार परिषद घेऊन स्फोटक खुलासे करण्याचे सुतोवाचदेखील या भेटप्रसंगी अंजली दमानिया यांनी केले.
जिगाव प्रकल्पातील गैरव्यवहार उघड करणार!
By admin | Published: May 28, 2016 1:47 AM