- नीलिमा शिंगणे-जगडअकोला: इच्छाशक्तीपुढे कुठलीही बाधा अडसर ठरत नाही, याचा दाखलाच अकोल्यातील अंध भावंडांनी आत्मबळावर उच्च शिक्षण घेऊन दिला आहे. आज दोघेही कोणावरही विसंबून न राहता, आत्मसन्मानाने जगत आहेत. शारीरिक व्यंग घेऊन जन्माला येऊनही या दोघा बहीण-भावाने आपापल्या व्यंगाला आपले अपूर्णत्व मानायला नकार दिला. अपंगत्व हे मानसिक असते. मानले तरच अपंगत्व, नाही, तर त्याच्यावर मात करू न तुम्हाला खूप उंच उडता येते, अशा मताची ही भावंडे़राखीचे जन्मत: कमजोर डोळे. चौथ्या वर्गापासून राखीची दृष्टी कमी व्हायला लागली. मित्र-मैत्रिणी राखीला पुस्तक वाचून दाखवायचे. वाचून दाखवलेलं राखी स्मरणात ठेवायची. लेखनिकाच्या मदतीने परीक्षा द्यायची. राखीने सामान्यांच्या शाळा-महाविद्यालयात शिकून एमए इंग्लिशपर्यंतच शिक्षण घेतले. हलाखीच्या परिस्थितीत शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चासाठी आई-वडिलांची तडजोड हे सर्व राखीला दिसत नसलं तरी तिला जाणवायचं. म्हणून तिने जिद्दीने शिक्षण पूर्ण करीत पदव्युत्तर झाली. आज इंग्रजीचे शिकवणी वर्ग घेऊन राखी आई-वडिलांना हातभार लावते. राखीची जिद्द शिक्षणावर थांबली नसून, तिला गायनाचा छंद आहे. त्याबरोबरच अकोल्यात होणाº्या छोट्या-छोट्या कार्यक्रमातील ‘फॅशन शो’मध्ये ती भाग घेते. आपल्यात दृष्टीची कमी असतानाही नेहमी हसरा चेहरा ठेवणाºया राखीच्या हसºया चेहºयामागची जिद्द पाहून एखाद्या डोळसालाही लाजवेल. भविष्यात प्राध्यापक व्हायची इच्छा राखीची आहे. राखीचे वडील अशोककुमार एका खासगी दुकानात नोकरी करतात. आई मधू गृहिणी आहेत. महिन्याकाठी मिळकतही तोडकीच. त्यात तीन मुलांचा भार, राखी आणि तिचे दोन्ही भाऊ सामान्यांप्रमाणे नाहीत. राखीचा मोठा भाऊ गतिमंद होता, काही वर्षांपूर्वीच त्याचं निधन झालं, तर राखीचा लहान भाऊ सागरसुद्धा अंध आहे. त्यानेही बीएपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंय. सध्या तो बँकिंग स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. भविष्यात बँक अधिकारी किंवा आयएएस त्याला व्हायचं आहे. अॅन्ड्रॉइड मोबाइल फोनमधील टॉक बॅक या सॉफ्टवेअरच्या आधाराने यू-ट्युबवरील व्हिडिओ ऐकून सागर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो.राखीने पदव्युत्तरपर्यंत शिक्षण पूर्ण करून शिकवणी वर्गाच्या आधारे स्वत:च्या पायावर उभी राहिल्याने, तिच्या आई वडिलांना याचा सार्थ अभिमान आहे. राखीची बुद्धिमत्ता पाहता यांचा उपचार व्हायला हवा, हे तिच्या वडिलांना वाटते; पण परिस्थितीने हतबल असल्याने पुढील उपचार करू शकत नाहीत. दोन्ही डोळ्यांनी अंध राखी विना ब्लॅक बोर्ड शिकवणी वर्गात विद्यार्थ्यांना शिकविते. इतर शिकवणी वर्गात जेवढं समजून सांगितल्या जाते, त्यापेक्षा राखीने शिकविलेलं विद्यार्थ्यांना सोपं जातं. त्यामुळेच राखीकडे विद्यार्थ्यांची संख्या वाढताना दिसतेय. शरीराने धष्टपुष्ट असलेले अनेकजण आपलं शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. त्यात दोन्ही डोळ्यांनी अंध असतानाही सामान्यांच्या शाळेत शिकून, उच्च शिक्षण घेणारे जीवतानी भावंडं एक प्रेरणा आहे.