अकोला : कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या संकल्पनेतून अकोला, वाशिम व बुलडाणा या तीन जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ४ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता अकोल्यातील श्रीमती ल.रा.तो. महाविद्यालय येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख उपस्थिती म्हणून पालकमंत्री डॉ. रणजित पाटील उपस्थित राहणार आहेत. या रोजगार मेळाव्याला मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद व इतर शहरातील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून बेरोजगार युवक-युवतींना प्राधान्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत. त्यानुषंगाने या मेळाव्यात पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार असून, त्याच दिवशी उमेदवारांची निवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अकोला, वाशिम व बुलडाणा या तीन जिल्ह्यांतील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी ३ आॅक्टोबरपर्यंत संबंधित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नावाची नोंदणी करावी आणि ४ आॅक्टोबर रोजी शैक्षणिक पात्रता व संबंधित मूळ कागदपत्रांसह अकोला येथे आयोजित रोजगार मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.