अतुल जयस्वाल/अकोला : अपंग असल्याचे बनावट प्रमाणपत्र मिळवून शासकीय योजनांचा लाभ घेणार्यांना चाप बसावा, यासाठी राज्य शासनाने गत वर्षापासून ऑनलाइन प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. या यंत्रणेमुळे प्रमाणपत्र मिळण्याची गती वाढेल, अशी अपेक्षा होती; परंतु विभागातील आकडेवारी पाहता या कामाला अपेक्षित गती प्राप्त झाली नसल्याचे दिसून येते. गत वर्षभरात अमरावती विभागातील पाच जिल्हय़ांमध्ये अपंग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज दाखल केलेल्या ४१ हजार ६९२ अर्जदारांपैकी ६0१७ जणांचे अर्ज फेटाळण्यात आलेत. अपंगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अपंगांना प्रमाणपत्र मिळवावे लागते. यासाठी प्रत्येक जिल्हा स्तरावर शासकीय रुग्णालयांमध्ये ह्यहॅन्डीकॅप मेडिकल बोर्डह्ण कार्यरत आहे. या वैद्यकीय चमूद्वारे तपासणी केल्यानंतर अपंगांना ऑनलाइन यंत्रणेद्वारे प्रमाणपत्र दिले जाते. संगणकीय यंत्रणेतील त्रुटी व मनुष्यबळाच्या अभावी ऑनलाइन प्रमाणपत्र वितरित करण्याचे काम अपेक्षित गतीने होताना दिसत नाही. जानेवारी २0१५ ते ६ जानेवारी २0१६ या कालावधीत अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्हय़ांमधील एकूण ४१ हजार ६९२ जणांनी अपंग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ३१ हजार २४२ जणांना अपंगांचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे, तर ६0१७ जणांचे अर्ज रद्द करण्यात आले असून, ४३३३ जणांच्या अर्जांवर काम सुरू असल्याचे महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीवरून समोर आले आहे.
अपंग प्रमाणपत्र वितरणाचे काम कूर्म गतीने
By admin | Published: January 07, 2016 2:33 AM