वनविभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्वयंसेवी संस्था व तक्रारकर्त्यांचा सहभाग
अकोला : अकोला-पातूर-मेडशी- वाशिम ते हिंगोली बॉर्डर या रस्त्याचे नव्याने बांधकाम होणार असून, रस्त्यामध्ये येणाऱ्या झाडांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले होते; मात्र तीन हजार झाडांची तफावत असल्याने तसेच या संदर्भात तक्रारी व स्वयंसेवी संस्थेने आक्षेप घेतल्यानंतर या १०० किलोमीटर रोडवरील झाडांचे पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वनविभाग, तक्रारकर्ते व स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत. हे सर्वेक्षण मंगळवारपासून संयुक्तरीत्या होणार आहे.
अकोला-मेडशी-वाशिम ते हिंगोली बॉर्डर या रस्त्याचे बांधकाम व रुंदीकरणास प्रारंभ झालेला आहे. वनविभागाचे अकोला वनपरिक्षेत्र, पातूर वनपरिक्षेत्र, मेडशी, वाशिम व हिंगोली वनपरिक्षेत्रातून हा रस्ता जाणार आहे. त्यामुळे वनविभागाच्या झाडांची मोजणी एका सर्वेक्षणाद्वारे करण्यात आली होती. या मोजणीनुसार वनपरिक्षेत्रातील झाडे दहा हजार असल्याची नोंदणी करण्यात आली होती; मात्र त्यानंतर ही झाडे ७ हजार ४०२ दाखविण्यात आल्याच्या तक्रारी झाल्या. तब्बल २ हजार ५०० झाडे गायब असल्याच्या तक्रारी झाल्यानंतर तसेच स्वयंसेवी संस्थेने आक्षेप घेतल्यानंतर वनविभागाचे उपवनसंरक्षक अर्जुना के. आर. यांनी तक्रारदारांचे निरसन करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांना सोबत घेऊन पुन्हा सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार अकोला वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, तक्रारकते व स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन या सर्वेक्षणास मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे. तक्रारकर्त्यांचा तक्रारी जाणून घेऊन त्यांना कोणती झाडे गायब असल्याचे दिसले ते सर्व त्यांच्या साक्षीने सर्वेक्षणात नोंद करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर तक्रार यांचे शंका व आक्षेपांचे निरसन करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
वनविभागाच्या पाच परिक्षेत्रात सर्वेक्षण
अकोला-पातूर-मेडशी-वाशिम ते हिंगोली बॉर्डर हा रस्ता नव्याने बांधून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. वनविभागाच्या वनपरिक्षेत्रात येत असलेल्या झाडांची मोजणी पूर्ण झालेली आहे; मात्र या मोजणीत तफावत असल्याची तक्रार केल्यानंतर आता नव्याने ही मोजणी सुरू होणार आहे. पाच परिक्षेत्रांतील झाडांची मोजणी होणार असल्याने १५ ते २० दिवसांचा कालावधी या पूर्ण प्रक्रियेला लागणार असल्याची माहिती आहे.
कोट
अकोला-वाशिम ते हिंगोली बॉर्डर या रस्त्यावरील वनविभागाच्या जंगलातील झाडे गायब झाल्याचा संदर्भात तसेच अन्य काही प्रकारच्या तक्रारी करण्यात आलेले आहेत. त्यामुळे तक्रारकर्ते स्वयंसेवी संस्था व शासनाचे सर्व संबंधित विभागाने सोबत घेऊन मंगळवारपासून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर तक्रारकर्त्यांच्या आक्षेपांची तातडीने निरसन करण्यात येईल. झाडांच्या मोजणीतीळ तफावत या सर्व क्षणात दूर होईल.
राजेंद्र ओवे
वनपरिक्षेत्र अधिकारी अकोला