अकोला: स्पर्धेच्या युगात प्रत्येकांना चांगले व उच्च शिक्षण घेणे ही काळाची गरज असून, महानगरपालिकेतील शाळांमधील विद्यार्थ्यांनासुद्धा इंग्रजी भाषेचे ज्ञान मिळावे, यासाठी केंद्रीय राज्यमंत्री अॅड. संजय धोत्रे यांच्या संकल्पनेतून गत शैक्षणिक सत्रापासून मनपा शाळांमध्ये जॉली फोनिक्स पद्धतीद्वारे इंग्रजी भाषा शैक्षणिक कार्यक्रम सुरू केला आहे. यामुळे शिक्षणाप्रति गोडी निर्माण होऊन विद्यार्थ्यांची उपस्थितीत मोठ्या प्रमाणात फरक दिसून येत आहे, असे मत आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केले.मनपाच्यावतीने इयत्ता पहिली, दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दांची ओळख होऊन त्यांना इंग्रजी भाषा लिहिता व वाचता यावी यासाठी जॉली फोनिक्स किड्स वर्ल्ड एज्युकेशन मुंबई संस्थेअंतर्गत जॉली फोनिक्स पद्धती अवगत करण्यासाठी मनपा शाळा मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा मराठा मंडळ मंगल कार्यालय आयोजित केली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन आमदार रणधीर सावरकर यांनी केले. अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त संजय कापडणीस होते. प्रमुख अतिथी म्हणून उपमहापौर वैशाली शेळके, महिला व बाल कल्याण समिती सभापती मनीषा भन्साली, नगरसेविका सुनीता अग्रवाल, सारिका जयस्वाल, सुहासिनी धोत्रे, मंजूषा सावरकर, समीक्षा धोत्रे, मनपा उपायुक्त विजय म्हसाळ, प्रमोद कापडे उपस्थित होते.यावेळी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी, मनपा शाळातील सर्व शिक्षकांनी आत्मचिंतन करून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन पटसंख्येत वाढ कशी होईल आणि सामान्य मुलांनाही इंग्रजी भाषेची भीती न वाटता पुढच्या काळात स्पर्धा परीक्षेकरिता सक्षमपणे पुढे जाण्यासाठी दिशा कशी मिळेल, या दिशेने काम करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत मांडले. कार्यक्रमामध्ये जॉली फोनिक्स इंग्रजी उपक्रम मनपा शाळांमध्ये उत्कृष्टपणे राबविल्याबाबत मुख्याध्यापक व शिक्षकांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. कार्यशाळेमध्ये किड्स वर्ल्ड एज्युकेशन कन्सलटंट, एनसीडीआर फाउंडेशनच्या नीती नगरकर,अनघा बाहुलीकर यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांना जॉली फोनिक्स पद्धतीबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मनोज बोचरे यांनी, संचालन वैशाली शेंडे यांनी केले तर आभार शिक्षणाधिकारी डॉ. शाहीन सुलताना यांनी मानले. (प्रतिनिधी)