अकोला: महापालिकेच्या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून इंग्रजी भाषा तसेच इंग्रजी विषय सोप्या पद्धतीने शिकविण्यासाठी जॉली फोनिक्स संस्थेमार्फत उपक्रम राबविला जाणार आहे. या संस्थेद्वारे गतवर्षी जिल्हा परिषदेच्या सात प्राथमिक शाळांमध्ये हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला होता. ही सुविधा मनपाच्या शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यावर महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी शिक्कामोर्तब केले आहे.जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इंग्रजी भाषेला महत्त्व आहे. इंग्रजी हा विषय शिकताना विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांच्या मनात भीती बाळगली जात असल्याचे चित्र दिसून येते. इंग्रजी भाषा व विषय अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगणे व शिकविण्यासाठी लंडनस्थित जॉली फोनिक्स संस्थेने विशिष्ट पद्धत विकसित केली आहे. सर्वप्रथम तामिळनाडू राज्यातील शासकीय शाळांमध्ये हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविला जात आहे. त्यानंतर महाराष्ट्रात या उपक्रमाला अकोला जिल्हा परिषदेच्या सात शाळांमध्ये सुरुवात करण्यात आली. जॉली फोनिक्स संस्थेद्वारा शिकविल्या जाणाऱ्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. इंग्रजी भाषा समृद्ध व प्रभावी करण्यासाठी प्रशासनाने हा उपक्रम महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून या उपक्रमाला सुरुवात केली जाणार आहे.मनपा शिक्षकांना देणार प्रशिक्षण!संबंधित संस्थेच्यावतीने गतवर्षी प्राथमिक स्तरावर मनपाच्या इयत्ता पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणाºया शिक्षकांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून धडे दिले होते. यावर्षी इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाचे धडे दिल्या जातील. इयत्ता पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांना साहित्य देण्यासोबतच दोन्ही वर्गांच्या शिक्षकांचे पुन्हा प्रशिक्षण पार पडेल. विषय तज्ज्ञाचे प्रशिक्षक लवकरच मुंबईतून दाखल होणार असल्याची माहिती आहे.लोकप्रतिनिधींचा पुढाकारइंग्रजी विषयाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात भीती बाळगल्या जाते. ही भीती दूर करण्यासाठी इंग्रजी विषय सोप्या पद्धतीने शिकविण्यासाठी जॉली फोनिक्स संस्थेमार्फत उपक्रम राबविला जातो. या संस्थेद्वारे हा उपक्रम मनपा शाळेतही सुरू व्हावा, याकरिता आमदार रणधीर सावरकर यांनी ठोस प्रयत्न केले आहेत.