अकोला, दि. २७- शासनाच्या आदेशाअभावी जिल्ह्यातील पाच शासकीय धान्य गोदामांमध्ये पडून असलेल्या हजारो क्विंटल ज्वारीला मोठय़ा प्रमाणात सोंडे लागले असून, पोखरलेल्या ज्वारीचे पीठ झाल्याचे वृत्त बुधवारी ह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित होताच शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. गुरुवारी सकाळी ८.३0 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील धान्य गोदामांची जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी झाडाझडती घेतली. या ज्वारीचे नमुने घेण्यात आले असून, तपासणी केल्यानंतरच ज्वारी सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत वाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकार्यांनी यावेळी स्पष्ट केले. गतवर्षीच्या खरीप हंगामात शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यातील सातही तालुक्यांत हमी दराने ज्वारी खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. त्यापैकी पाच तालुक्यांत खरेदी करण्यात आलेली ५८ हजार ६२८ क्विंटल ज्वारी शासकीय धान्य गोदामांमध्ये साठविण्यात आली. मात्र शासकीय धान्य गोदामांमध्ये पडून असलेली ज्वारी वितरित करण्याचा आदेश शासनामार्फत पुरवठा विभागाला प्राप्त झाला नसल्याने ज्वारीमध्ये मोठय़ा प्रमाणात सोंड्यांचा प्रादुर्भाव झाला होता. यासंदर्भात ह्यशासकीय धान्य गोदामांतील ज्वारीचे झाले पीठह्ण अशा आशयाचे वृत्त २६ ऑक्टोबर रोजी ह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित झाले. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी २७ ऑक्टोबर रोजी सकाळी पाहणी केली व जिल्हा पुरवठा अधिकार्यांना नमुने घेण्याच्या सुचना केल्या. जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांना यांनी गोदामातील ज्वारीचे नमुने घेतले.
ज्वारीच्या गोदामांची जिल्हाधिका-यांनी घेतली झाडाझडती!
By admin | Published: October 28, 2016 2:59 AM