अकोला: एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलेली सहायक उपनिबंधक सुनंदा चिं तामण मोरे, तिचे सहकारी आशिष पिंजरकर, हिंमत शिरोळे यांच्या पोलिस कोठडीची मंगळवारी मुदत संपल्याने एसीबीचे पोलिस उपअधीक्षक उत्तमराव जाधव यांनी तिघांनाही जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघाही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले. बँकेत गहाण असलेल्या प्लॉटवर बोजा चढवायला आवश्यक असलेल्या खतावणी प्रमाणपत्रासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारणार्या सहायक उपनिबंधक सुनंदा चिंतामण मोरे व तिचे सहकारी आशिष पिंजरकर, हिंमत शिराळे यांना २९ सप्टेंबर रोजी अटक केली होती. एसीबी पथकाने मोरे हिच्या दुर्गा चौकातील आणि पुण्यातील घरांची मंगळवारी झडती घेतली. झडतीदरम्यान मोरे हिच्या दुर्गा चौकातील घरामध्ये एकूण ३३ लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता मिळून आली होती. पुणे एसीबीने पुण्यातील घराचीसुद्धा झडती घेतली होती. तसेच एसीबीने शहरातील अनेक राष्ट्रीयीकृ त बँकाना पत्र देऊन तिच्या खात्यांची माहिती मागवली. ७ ऑक्टोबर रोजी आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने एसीबीने आरोपींना न्यायालयात हजर केले होते. आरोपींनी जामीन मिळण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला; परंतु त्यांच्या अर्जावर ९ ऑक्टोबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता असल्याने, आरोपींना तोपर्यंत कारागृहात राहावे लागणार आहे. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ प्रवीण चिंचोले यांनी तर आरोपीतर्फे अँड. प्रवीण हातेकर, अँड. प्रकाश वखरे यांनी बाजू मांडली.
लाचखोर महिला व सहका-यांना न्यायालयीन कोठडी
By admin | Published: October 08, 2014 12:37 AM