यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. दमदार पाऊस बरसणार व पिकेही चांगली होणार असल्याची प्रत्येकाला अपेक्षा होती; परंतु सुरुवातीचे काही दिवस बरसल्यानंतर पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. अधुनमधून थोड्याफार सरी कोसळतात. यामुळे काही प्रमाणात पिकाला जीवदान मिळत आहे. जिल्ह्यामध्ये २९ टक्के क्षेत्रात पेरण्या आटोपल्या आहेत; मात्र जून महिना उलटला, तरी पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यामध्ये पेरण्या रखडल्या आहेत. यामध्ये शंभर मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
आठवडाभरात १९ टक्के क्षेत्रात वाढ
मागील आठवड्यात जिल्ह्यातील मूर्तिजापूर, पातूर, बार्शीटाकळी व अकोला जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील पेरणी क्षेत्र १० टक्क्यांवरून २९ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
आतापर्यंत झालेला पाऊस...
९४.४ मि.मी.
आतापर्यंत झालेली पेरणी
२९ टक्के
अकोट तालुक्यात विदारक स्थिती
जून महिन्यात झालेल्या पावसात अकोट तालुक्यात सर्वात कमी ४९.६ मि.मी. नोंद झाली आहे. त्यामुळे या तालुक्यात अतिशय विदारक स्थिती दिसून येत आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांची पिके कोमेजण्याच्या मार्गावर आहेत.
शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे!
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदाही मागीलवर्षीप्रमाणेच अनुभव येत आहे. एकीकडे आजुबाजूच्या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत, मात्र अकोला जिल्ह्यात पावसाचा खंड पडल्याचे दिसून येत आहे.
सध्या जिल्ह्यामध्ये दमट, उष्ण वातावरणाचा अनुभव येत आहे. मान्सूनमध्ये खंड सुरूच असून स्थानिक स्वरुपात पावसाचे वातावरण तयार होत आहे. त्यामुळे तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचे अनुमान आहे.
- संजय अप्तुरकर, हवामान अभ्यासक
अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. ३५००-३६०० रुपये दराने बी-बियाणे विकत घेतले आहे. पाऊस पडत नसल्याने पिके कोमेजण्याच्या मार्गावर आहेत. वन्यप्राण्यांचाही मोठा त्रास होत आहे.
- संतोष टाले, शेतकरी, माझोड