अकोला : रायली जीन परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्डय़ावरून आतापर्यंत तीन खून झाले असून, हा अड्डा कायस्वरूपी बंद होत नसल्याने हत्याकांडाचे सत्र थांबत नाही. २५ जून रोजी झालेल्या सशस्त्र संघर्षाच्या निमित्ताने हे वास्तव समोर आले आहे. रामदास पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या रायली जीन परिसरात २५ वर्षांपूर्वी जुगार अड्डा सुरू झाला. या परिसरात ट्रान्सपोर्ट कंपन्यांची गोदामे असून, बाजारपेठही आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १९९0 च्या दशकात या परिसरात जुगार अड्डा सुरूझाला. १९९४ मध्ये अब्दुल रफीक नामक एका व्यवसायिकाशी जुगार अड्डय़ावरून वाद घालण्यात आला. या वादातून अब्दुल रफिक यांचा खून करण्यात आला. त्यानंतर या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी १९९६ मध्ये जाफर खानचा खून करण्यात आला. या दोन्ही हत्याकांडातून पोलिस प्रशासानाने धडा घेतला नाही. २५ जून २0१४ रोजी जुगार अड्डय़ावरून दोन गटात सशस्त्र संघर्ष झाला. यामध्ये शेख अक्रम शेख बुरहान नौरंगाबादी, शेख सलिम शेख बुरहान, शेख अली, नगरसेविकेचे पती महेबूब खान ऊर्फ मब्बा यांच्यावर हल्ला झाला. हल्ल्यात शेख अक्रम याचा मृत्यू झाला. याप्रकरणी रामदास पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस हा सशस्त्र संघर्ष पूर्ववैमनस्यातून झाल्याचा दावा करीत असले, तरी वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. घटनेच्या एक दिवसापूर्वी जुगार अड्डय़ामधील देवाण-घेवाणीवरून वाद झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानंतर रात्री या वादाचे पर्यवसान हत्याकांडात झाले, असाही दावा सूत्रांकडून होत आहे.
जीनमधील अड्डा हत्याकांडांना कारणीभूत
By admin | Published: July 02, 2014 12:21 AM