आशिष गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच शहरात राज्यस्तरीय महापौर कबड्डी चषक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेवरून भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडद्याआड कबड्डीचा जोरदार सामना रंगल्याची माहिती आहे. कौलखेडमध्ये कबड्डी सामने आयोजित न करण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकार्यांनी भाजपाला दिल्यामुळे ऐन गुलाबी थंडीत क्रीडा क्षेत्रातील वातावरण तापण्याची चिन्हे दिसून येत आहेत. क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंसाठी पोषक वातावरण निर्मिती व्हावी, या उद्देशातून महापालिकेतील सत्ता पक्ष भाजपाने नव्या क्रीडा धोरणावर अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. आजवर मनपातील क्रीडा विभागाच्या माध्यमातून कोणत्याही क्रीडा स्पर्धांचे आयोजन न झाल्यामुळे मागील काही वर्षांपासून या विभागाचे कामकाज ठप्प पडले होते. ही बाब सत्ताधारी भाजपाच्या निदर्शनास येताच त्यांनी मनपाचे नवे क्रीडा धोरण तयार करण्याचा निर्णय घेतल्यामुळे क्रीडा विभाग सक्रि य झाला आहे. व शहरात प्रथमच राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी महापौर विजय अग्रवाल, नगरसेविका योगिता पावसाळे यांनी पुढाकार घेतला असून, अँमॅच्युअर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ, अमरावतीकडून कबड्डी स्पर्धेची परवानगी मिळाल्याची माहिती आहे. भाजपाने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कौलखेड परिसरात महापौर कबड्डी चषक स्पर्धेवर शिक्कामोर्तब करताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही स्थानिक पदाधिकार्यांनी कौलखेडमध्ये कबड्डी सामने आयोजित न करण्याचा इशारा भाजपाला दिल्याची माहिती आहे. राकाँ पदाधिकार्यांमार्फत जानेवारी महिन्यात शहरात राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले जाणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रीय क बड्डी स्पर्धांची तारीख अद्याप निश्चित झाली नसताना राष्ट्रवादीने कौलखेड परिसरात होणारे सामने शहरात इतरत्र कोठेही हलविण्यासाठी मनपा प्रशासनावर दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे.
अँमॅच्युअर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भाची मंजुरीकबड्डी स्पर्धांच्या आयोजनासाठी अँमॅच्युअर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ व स्थानिक कबड्डी असोसिएशन या दोघांपैकी एकाची मंजुरी क्रमप्राप्त ठरते. जानेवारी महिन्यात शहरात कोणतेही कबड्डी सामने नसल्यामुळे विदर्भ असोसिएशनने महापालिकेला सामन्यांसाठी मंजुरी दिल्याची माहिती आहे.
क्रीडा स्पर्धांचे आयोजन भाजपाने केले आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कबड्डी सामन्यांचे आयोजन कौलखेड परिसरातच होईल. क्रीडा क्षेत्राची आवड असणार्या सर्वांनी सामन्यांचा आस्वाद घ्यावा, दबावासमोर झुकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. -विजय अग्रवाल, महापौर.