विवेक चांदूरकर/ अकोला : विदर्भात लाखो हेक्टरवर पेरणी करण्यात आलेल्या कपाशीची झाडे सुकत आहेत. कोणताही रोग नसताना झाडे सुकण्याच्या प्रकारात वाढ होत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पावसाची दांडी आणि तापमान वाढीमुळे कपाशीच्या रोपांना 'हिट शॉक' बसल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. विदर्भात ओलिताची व्यवस्था असलेल्या शेतकर्यांनी लाखो हेक्टरवर १५ मे ते जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात कपाशीची पेरणी केली. दरवर्षीच मोठय़ा प्रमाणात विदर्भात कपाशीची धूळ पेरणी करण्यात येते. पावसाळ्यात आलेल्या पावसाचा या पिकांना फायदा होतो व उत्पादनात वाढ होते; मात्र यावर्षी धूळ पेरणी केलेल्या या कपाशीची रोपे सुकायला लागली. दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. शेतकर्यांनी तक्रार केल्यानंतर कृषी विभागाने कपाशीच्या रोपट्यांचे नमुने तपासणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे पाठविले. विद्यापीठाच्या चमूने रोपांच्या नमुन्यांची तपासणी केली आणि शेतात जाऊन पाहणीही केली. त्यानंतर कपाशीच्या रोपांना हिट शॉक बसल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला. मे महिन्यात विदर्भात ४0 डिग्रीपेक्षा जास्त तापमान होते. जूनच्या पहिल्या आवठड्यातही तापमान कायम होते. जूनच्या दुसर्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर पावसाने दडी मारली असून, तापमानात पुन्हा वाढ झाली. त्यामुळे कपाशीची रोपे सुकत आहेत. कपाशीची रोपे ३४ ते ३५ डिग्री तापमानात तग धरू शकतात; मात्र मे महिना व जूनच्या पहिल्या आठवड्यात तापमान ४0 डिग्रीपेक्षा जास्त होते, त्यामुळे रोपे सुकत आहेत. आता पाऊस येत नसल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट आहे. ओलिताची सोय असलेले शेतकरी पिकांना पाणी देत असले, तरी तापमानात वाढ कायम आहे. त्यामुळे रोपे सुकण्याचा प्रकार सुरूच आहे. कपाशीवर कोणताही रोग आला नसल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले. यासंदर्भात कृषी विद्यापीठाचे संशोधक टी एच राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कपाशीची रोपे ३५ डिग्री तापमानापर्यंत तग धरू शकतात; मात्र मे महिन्यात कपाशीची पेरणी करण्यात आली, त्यावेळी तापमान जास्त होते. याशिवाय गत आठ दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने तापमान वाढले आहे. परिणामी कपाशीला हिट शॉक बसला असून, त्यामुळे रोपे सुकत असल्याचे स्पष्ट केले.
*एक आठवड्यात रोपे जळतील
तापमान जास्त असल्यामुळे कपाशीची रोपे जळत आहेत. शेतात दिसत असलेल्या या रोपांची वाढ होत नाही. ही रोपे पूर्णत: मृत झाली नाही; मात्र रोपे जगणारही नाहीत. एका आठवड्यात ती पूर्णत: जळणार आहेत. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होणार आहे.
*मॉन्सूनमध्ये पेरणी केलेल्या कपाशीवर परिणाम नाही
मॉन्सूनच्या पावसानंतर, जूनच्या पंधरवड्यानंतर कपाशीची पेरणी केलेल्या कपाशीची रोपे चांगल्या अवस्थेत असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे. मे महिन्यात पेरणी करण्यात आलेल्या रोपांनाच हिट शॉक बसला असून, ही रोपे जळत असल्याचे त्यांनी सांगितले.