अकोला : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मुंबई पश्चिम उपनगराचे अतिरिक्त जिल्हाधिकारी कैलास पगारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीईओ एस. रामामूर्ती यांची नागपूर येथे बदली झाल्यांनतर, त्यांच्या जागी एमएमआरडीचे डॉ. संजय यादवी यांच्या नियुक्तीचा आदेश निघाला होता. मात्र, ते रुजू होणार नाहीत, अशी चर्चा नियुक्तीचा आदेश जिल्हा परिषदेत धडकताच सुरू होती, ती खरी ठरली. त्यामुळे आता पगारे तरी रुजू होतील का? अशी चर्चा जि.प.वर्तुळात सुरू झाली आहे.सीईओ एस. रामामूर्ती यांची नागपूर येथे खाण महामंडळाच्या महाव्यवस्थापकपदी बदली करण्यात आली होती. सीईओ पदी एमएमआरडीचे संजय यादव यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, ते रुजू झाले नाही. त्यामुळे र्सीओंचा प्रभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांच्याकडे देण्यात आला. डॉ. यादव हे ठाणे येथे आदिवासी विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाले असून, गेल्या आठवड्यात डॉ. पवार यांचीसुद्धा भंडारा येथे बदली झाली. मात्र, सीईओचा प्रभार पवार यांच्याकडे असल्यामुळे ते भंडारा येथे रुजू झाले नाहीत. दरम्यान, बुधवारी कैलास पगारे यांच्या नियुक्तीचा आदेश काढण्यात आला आहे. मात्र, याबाबत बुधवारी संध्याकाळपर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाला शासन स्तरावरून कोणतीही माहिती पाठवण्यात आली आली नव्हती.