अकोला : शहरातील श्रीमती लरातो वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी काजोल गावंडे हिने अत्यंत बिकट परिस्थितीत शिक्षण घेऊन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.कॉम. च्या परीक्षेत विद्यापीठातून दुसरी मेरीट आली. रौप्यपदक पटकावून तिने आपल्या अकोला शहराचे आणि महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.नुकत्याच ३६ व्या दीक्षांत समारंभात राज्यपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रिय मंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते तिला रौप्यपदकाने सन्मानित केले आहे. तिच्या यशाने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे, असे गौरवोद्गार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीप्रभू चापके यांनी तिचा सत्कार करताना काढले. तिच्या या यशामागे महत्त्वाचा वाटा हा डॉ. श्रीकृष्ण राऊत, डॉ. महेश डाबरे यांचा आहे, असे तिने आवर्जुन सांगितले, कारण अभ्यास करताना त्यांनी तिला नेहमीच प्रेरित केले आहे.आईची प्रचंड मेहनत व वडिलांचे काबाडकष्ट यामुळेच हे पदक मिळाले म्हणून तिने दोघांच्या कष्टास अर्पण केले आहे. तिचे वडील ओमप्रकाश गावंडे आॅटो चालवतात. तिला वेळोवेळी गुरुजनांचे मार्गदर्शन लाभले म्हणूनच हे यश तिला मिळवता आले, असे तिने बोलताना सांगितले. भविष्यात समाजोपयोगी कार्य करून बँकेत आॅफिसर होण्याचा मानस तिने व्यक्त केला आहे.