अकोला : बाळापूर तालुक्यातील खारपाणपट्टय़ातील कंचनपूर प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात येणार्या शेतीचा शेतकर्यांना देण्यात येणारा मोबदलाही पूरक नसल्याने शेतकर्यांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. त्यामुळे या प्रकल्प गुंडाळण्यात येणार आहे. बाळापूर तालुक्यातील हातरूननजिक असलेल्या कंचनपूर येथे ११00 हेक्टर सिंचन क्षमतेचा प्रकल्प बांधण्यात येणार होता. २६ जून २00९ मध्ये या प्रकल्पाच्या बांधकामासाठी शासनाने प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यानुसार निविदा बोलावण्यात आल्या आणि १ जुलै २00९ रोजी प्रकल्पाच्या बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. ३१ ऑगस्ट २00९ रोजी कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आले. या प्रकल्पात या भागातील काही गावे बुडीत क्षेत्रात येत असल्याने या गावांचे पुनर्वसन करणे क्रमप्राप्त आहे. परंतु अधिग्रहित करण्यात येणार्या जमिनीचा मोबदला पूरक नसल्याचा आरोप शेतकर्यांनी केला असून, काही गावकर्यांनी पुनर्वसनास विरोध केला. परिणामी या प्रकल्पाचे काम थांबले असून, या प्रकल्पाच्या बांधकामासाठी आलेला ३४ कोटी ३0 लाख रुपयांच्या निधीतील एक पैसाही सिंचन विभागाला खर्च करता आला नाही. त्यामुळे हा निधी विदर्भ सिंचन विकास महामंडळाकडे पडून आहे.
कंचनपूर प्रकल्प अखेर गुंडाळणार!
By admin | Published: February 16, 2016 1:42 AM