- नितीन गव्हाळे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: ज्येष्ठ गांधीवादी, सर्वोदयी नेते म्हणून कन्नुभाई नानाभाई मश्रुवाला यांचे शनिवारी निधन झाले. कन्नुभाई त्यांच्या संपूर्ण हयातीत गांधी विचारांनुसार जगले. स्वातंत्र्यसेनानी म्हणून त्यांनी कधीही गवगवा केला नाही. देशासाठी योगदान देणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. या कर्तव्याबद्दल शासनाकडून मोबदला घेणे योग्य नाही. म्हणून शासनाने स्वातंत्र्यलढ्यातील योगदानासाठी देऊ केलेला ताम्रपटसुद्धा नाकारला. यावरून त्यांच्या थोर व्यक्तिमत्त्वाची प्रचिती येते.कन्नुभाई यांचे वडील नानाभाई हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे व्याही होते. कन्नुभाई यांची बहीण सुशीलाबेन यांचा विवाह ६ जून १९२७ रोजी महात्मा गांधी यांचे द्वितीय चिरंजीव मणिलाल गांधी यांच्यासोबत झाला होता. मश्रुवाला कुटुंबासोबत बापूजींचे नाते भावनिक नव्हते, तर रक्तानेसुद्धा ते जुळलेले आहे. तोच स्नेहबंध मश्रुवाला कुटुंबाने आजतागायत जोपासला आहे. विवाहाच्यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधीसुद्धा उपस्थित होते. वºहाडात आल्यावर महात्मा गांधी आवर्जून मश्रुवाला कुटुंबीयांच्या भेटीला येत असत. महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन नानाभाई, त्यांचे सुपुत्र कन्नुभाई, किशोरलाल, शांतिलाल हे व्यवसाय सांभाळून स्वातंत्र्यलढ्यात योगदान द्यायचे. कन्नुभार्इंकडे गांधीजींशी जुळलेल्या अनेक आठवणी होत्या. त्यांचे पुतणे प्रियदर्शी, मुलगा डॉ. मुकुंद यांनी कन्नुभार्इंच्या स्वातंत्र्य चळवळीतील काही आठवणी, महात्मा गांधी यांच्यासोबतच्या नातेसंबंधांना ‘लोकमत’शी बोलताना उजाळा दिला. कन्नुभाई मश्रुवाला यांनी स्वातंत्र्य चळवळीत काम करताना सर्वोदयी कार्यकर्ते तयार केले. कारावास भोगला; परंतु त्याची वाच्यता कुठे केली नाही. प्रसिद्धीपासून तर नेहमीच दूर राहत. स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या योगदानाबद्दल शासनाने त्यांना ताम्रपट देण्याचे जाहीर केले; परंतु त्यांनी ताम्रपट स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते गांधी विचारांनुसार जगले.अनेक पुरस्कार नाकारले, केवळ सेवाश्री स्वीकारला!ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी म्हणून कन्नुभाई मश्रुवाला यांना अनेक सामाजिक संस्था, ट्रस्ट आणि केंद्र व राज्य शासनाकडून अनेक पुरस्कार जाहीर झाले; परंतु त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. काही वर्षांपूर्वी सेवाश्री पुरस्कार त्यांना जाहीर झाला. तो पुरस्कारही त्यांनी नाकारला. अखेर त्यांच्या समवयस्क मित्रमंडळींच्या आग्रहामुळे त्यांना सेवाश्री पुरस्कार स्वीकारावा लागला.शासनाची पेन्शनही नाकारली!स्वातंत्र्यसेनानींना राज्य शासनाच्यावतीने पेन्शन दिल्या जाते. त्यावेळी अनेकांनी स्वातंत्र्यसेनानी म्हणून पेन्शनसाठी अर्ज केले होते; परंतु कन्नुभार्इंनी कधीही अर्ज केला नाही. शासनानेच त्यांना पेन्शन देऊ केली; परंतु त्यांनी स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाबद्दल पेन्शन घ्यायची, हे योग्य नाही. म्हणून नम्रपणे शासनाची पेन्शनसुद्धा नाकारली.
नानासाहेब वैराळे जिवलग मित्र!स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळात त्यांचे अनेक मित्र होते. स्वातंत्र्यसेनानी चंदू ओक, माजी मंत्री नानासाहेब ऊर्फ मधुसूदन वैराळे हे त्यांचे जिगरी दोस्त होते. नानासाहेबांसोबत तर त्यांचे कौटुंबिक संबंध होते. सुख-दु:खात या दोन्ही दोस्तांनी एकमेकांना कायम साथ दिली.