काेविडमुळे पालक गमावलेल्या बालकांविषयी माहिती संकलित केली आहे. जिल्ह्यात वडिलांचे छत्र हरवलेले आणि पालक म्हणून केवळ आई असलेल्या जिल्ह्यातील ९१ महिलांसमाेर माेठा प्रश्न उभा ठाकला आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कृती दलाची आढावा बैठक बुधवारी घेतली. या बैठकीत कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांनाचा शोध घेऊन त्यांना शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना लाभ द्या. तसेच दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना बाल संगोपन योजनेअंतर्गत त्यांचे पालनपोषण, यथायोग्य संरक्षण व संगोपन करण्याचा आदेश दिला आहे.
काेविडमुळे विधवा झालेल्या महिलांना शासकीय याेजनांचा लाभ देण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार डाटा संकलित केला जात आहे. सध्या ९१ महिलांची माहिती मिळाली आहे.
विलास मरसाळे, महिला व बालविकास अधिकारी
......................
काेराेनाने ९१ महिलांना बनविले निराधार
काेराेनामुळे ज्या घरातील कर्ता पुरुष गमावला आहे, अशा घरांची माहिती संकलित केली असता ९१ कुटुंबाचा आधार गेल्याचे समाेर आले आहे.
जिल्ह्यात ७४ बालकांचे पालकरूपी छत्र हरवले आहे. त्यामध्ये ४५ बालकांच्या वडिलांचे व २९ बालकांच्या आईचे छत्र हरवले. त्यामध्ये २६ मुले व १९ मुलींच्या वडिलांचा आणि १५ मुले व १४ मुलींच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
कोरोनामुळे आई किंवा वडील यापैकी एका पालकाचा मृत्यू झालेल्या बालकांना शासनाच्या बालसंगोपन योजनेचा आधार देण्यात येणार आहे.
........
संजय गांधी निराधार याेजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा याेजना याअंतर्गत विधवांना लाभ दिला जाणार आहे. पात्र महिलांनी संबंधित तहसीलदारांंकडे अर्ज करावा लागणार आहे. एकल पालक असलेल्या पात्र बालकांना बाल संगोपन योजनेंतर्गत दरमहा १ हजार १०० रुपयांप्रमाणे मदतीचा लाभ मिळू शकतो.