६९३ जणांनी केली काेराेना चाचणी
अकाेला : शहराच्या विविध भागात काेराेनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. काही दिवसांपासून काेराेना बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. दरम्यान, काेराेनाची लक्षणे आढळून येणाऱ्या ६९३ जणांनी गुरुवारी चाचणी केली़ यामध्ये ५१ जणांनी आरटीपीसीआर व ६४२ जणांनी रॅपिड ॲंटिजन चाचणी केली. संबंधितांचे अहवाल चाचणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.
रस्त्यालगतच्या हातगाड्या जप्त
अकाेला : मुख्य रस्त्यालगत हातगाड्यांवर व्यवसाय थाटून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमकांवर गुरुवारी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई केली. यावेळी हातगाड्या जप्त करण्यात आल्या. कारवाईत प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, जीवन मानकीकर, करण ठाकुर, रफीक अहमद, रूपेश इंगळे, वैभव कवाडे, योगेश कंचनपुरे, जय गेडाम, संतोष भगत, पवन चव्हाण आदींचा समावेश होता.
‘डाॅक्टर्स डे’निमित्त भाजपकडून सत्कार
अकाेला : ‘डाॅक्टर्स डे’चे निमित्त साधत काेराेनाच्या संकटात जीव धाेक्यात घालून रुग्णांचे प्राण वाचविणाऱ्या डाॅक्टरांचा भाजपच्यावतीने सत्कार करण्यात आला. प्रभाग क्रमांक १५ मधील मनपा शाळा क्रमांक १६ येथे भाजप नगरसेविका शारदा खेडकर यांनी आयाेजित केलेल्या कार्यक्रमात आमदार रणधीर सावरकर, किशाेर मांगटे पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
भाजपतर्फे वसंतराव नाईक यांना अभिवादन
अकोला : हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचा आदर्श जाेपासण्याची गरज असल्याचे सांगत भाजपच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी नाईक यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन केले. गुरुवारी भाजप कार्यालयात नाईक यांना अभिवादन करण्यासाठी कार्यकर्ते उपस्थित हाेते.
‘त्या’ वक्तव्याचा भाजपकडून निषेध
अकाेला : एका वृत्तवाहिनीवर पंढरपूर येथील वारीविषयी पार पडलेल्या चर्चासत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विलास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्याबद्दल निंदनीय भाषेत वक्तव्ये केली. पुज्यनीय कराडकर यांच्याबद्दल असे अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर माफी मागावी, अशी मागणी करीत भाजप जिल्हा आध्यात्मिक समन्वय आघाडीने निषेध व्यक्त केला आहे.