सचिन राऊत
अकाेला : पाेलीस प्रशासन विविध कारणाने दरवर्षीच बंदाेबस्तात असते. मात्र २०२० हे वर्ष पाेलिसांसाठी माेठ्या तणावाचे आणि काेराेनाच्या बंदाेबस्तात गेले. नागरिक घरात असताना पाेलीस मात्र एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून ते जुलै महिन्यापर्यंत बंदाेबस्तात व्यस्त असल्याचे दिसून आले. जिवाची पर्वा न करता पाेलिसांनी रात्रंदिवस चाेख बंदाेबस्त बजावला.
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रहारचे नेते तुषार पुंडकर यांच्या हत्येनंतर पाेलिसांवर तपासाचा माेठा ताण हाेता. या हत्याकांडाचा उलगडा करण्यात पाेलिसांना यश येत नाही तोच काेराेनाचे संकट देशभर सुरू झाले. या संकटकाळातच पाेलिसांनाही बंदाेबस्तासाठी तैनात करण्यात आले. कडाक्याच्या उन्हात पाेलीस बंदाेबस्तात रात्रंदिवस कार्यरत हाेते. या काेराेनाचा फटका तब्बल १०० पाेलिसांना बसला. मात्र त्यामधून सावरत त्यांनी पुन्हा कर्तव्य बजावले. याच काेराेनामुळे एका पाेलीस कर्मचाऱ्याचाही मृत्यू झाला असून, त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची एण्ट्री
विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरलेले पाेलीस अधीक्षक अमाेघ गावकर यांचा कार्यकाळ पूर्ण हाेण्याआधीच त्यांची बदली करण्यात आली. त्यामुळे कर्तव्यतत्पर म्हणून ओळख असलेले जी. श्रीधर यांची अकाेल्यात एण्ट्री झाली. त्यांनीही रखडलेले प्रश्न मार्गी लावले. तर तपासाला वेग देत प्रलंबित प्रकरणे निकाली काढत एक यशस्वी संदेश दिला.
मीना येताच एसपी ऑफीसचे काम
अकाेल्याचे तत्कालीन पाेलीस अधीक्षक चंद्रकिशाेर मीना अमरावती परिक्षेत्राचे विशेष पाेलीस महानिरीक्षक म्हणून रुजू हाेताच पाेलीस अधीक्षक कार्यालयाचे बांधकाम झपाट्याने सुरू झाले. त्यापाठाेपाठ नवीन अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत यांनीही पदभार स्वीकारला. माेनिका राऊत या जिल्ह्यातील पहिल्या महिला अतिरिक्त पाेलीस अधीक्षक आहेत.
४०० घरांचे बांधकाम अंतिम टप्प्यात
पाेलिसांसाठी गरजेचे असलेल्या ४०० घरांचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. या घरांचे वाटप सुरू करण्याची प्रक्रिया राबविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे हे वर्ष पाेलिसांना त्यांच्या हक्काचे निवासस्थान देण्यात महत्त्वाचे ठरणार आहे.
गुंडांची तडीपारी अन् बंदाेबस्त
पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील गुंडांचा बंदाेबस्त केल्याचे वास्तव आहे. आठपेक्षा अधिक गुंडांना कमी कालावधीत दाेन वर्षांसाठी तडीपार केल्याची कारवाई प्रथमच करण्यात आली, तर अवैध धंदेवाल्यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई त्यांनी करीत एक गाव एक पाेलीस, वृद्धांसाठी वेगळी पाेलिसिंग सुरू केली.