जिल्ह्यासह शहरात संसर्गजन्य काेराेना विषाणूची लाट आल्यामुळे प्रशासकीय यंत्रणांची झाेप उडाली आहे. शहरात माेठ्या प्रमाणात काेराेना बाधित रुग्ण आढळून येत असल्याने आराेग्य यंत्रणेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. शहरात दरराेज किमान २०० ते २५० जण काेराेना पाॅझिटिव्ह असल्याचे अहवाल प्राप्त हाेत आहेत. धाेक्याची घंटा ओळखून महापालिका आयुक्त निमा अराेरा यांनी नियमांचे सक्तीने पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. काेराेना पाॅझिटिव्ह असल्यावरही रुग्ण घराबाहेर व बाजारपेठेत खुलेआम फिरत असल्याने काेराेनाचा माेठ्या झपाट्याने प्रसार हाेत आहे. शहरातील पूर्व व दक्षिण झाेन काेराेनाचे हाॅटस्पाॅट ठरल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. दरम्यान, पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील हायरिस्कमधील व्यक्ती काेराेना चाचणीसाठी पुढाकार घेत नसल्याची बाब समाेर आली आहे. त्यामुळे हायरिस्कमधील व्यक्तींच्या परिसरात जाऊन स्वॅब घेण्यासाठी मनपा ंआयुक्तांनी चार फिरत्या माेबाइल व्हॅनद्वारे स्वॅब जमा करण्याचे निर्देश बुधवारी जारी केले आहेत. यामुळे काेराेना चाचण्यांचे प्रमाण वाढून रुग्ण संख्येला आळा घालण्यास मदत हाेण्याची अपेक्षा आहे.
शहरातील काही भाग काेराेनाचे हाॅटस्पाॅट ठरू लागले आहेत. याला वेळीच आवर घालण्यासाठी संबंधित परिसरात तसेच थेट रूग्णाच्या संपर्कातील हायरिस्क व्यक्तींपर्यंत पाेहाेचून त्यांचे स्वॅब नमुने जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळण्याची गरज आहे.-निमा अराेरा आयुक्त,मनपा