जीवघेण्या काेराेना विषाणूची लाट ओसरल्याचे पाहून जून महिन्यापासून ‘अनलाॅक’च्या टप्प्याला सुरूवात करण्यात आली़ बंद पडलेल्या उद्याेग, व्यवसायांना नियमांच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली़ या कालावधीत नागरिकांनी काेराेनाचे सर्व नियम, निकष पायदळी तुडवित माेठ्या धुमधडाक्यात लग्नसाेहळ्यांचे आयाेजन केले़ त्याचे परिणाम जानेवारी महिन्याच्या अखेरनंतर समाेर आले़ शहरात फेब्रुवारी महिन्यापासून काेराेनाची दुसरी लाट आली़ यामध्ये पूर्व झाेन व दक्षिण झाेनमध्ये काेराेनाने हाहाकार निर्माण केला आहे़ या दाेन्ही झाेनमध्ये काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यानंतरही मनपा प्रशासनाकडून उपाययाेजना करण्यास विलंब करण्यात आल्याचे दिसून आले़ आता परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर मनपाने धावपळ सुरू केली आहे़
तीन जणांकडे दिली नियंत्रणाची जबाबदारी!
शहरातील चारही झाेनमध्ये काेराेनाचा वाढता प्रकाेप लक्षात घेता प्रशासनाने काॅन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे़ काॅन्टॅक्ट ट्रेसिंग व घराेघरी जाऊन सर्वेक्षणासाठी शिक्षक व आशा वर्कर यांची नियुक्ती केली आहे़ संबंधितांच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्व झाेनमध्ये मालमत्ता कर अधीक्षक विजय पारतवार, पश्चिम व उत्तर झाेनमध्ये नगर सचिव अनिल बिडवे व दक्षिण झाेनसाठी मालमत्ता अधीक्षक संदीप गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे़
यंदा पूर्व, दक्षिण झाेनमध्ये संसर्ग
शहरात काेराेनाचा पहिला रुग्ण ७ एप्रिल २०२० राेजी उत्तर झाेनमध्ये आढळून आला हाेता़ त्यावेळी उत्तर झाेन काेराेनाचा हाॅटस्पाॅट ठरला हाेता़ त्यापाठाेपाठ पश्चिम झाेनमध्ये काेराेनाचा फैलाव झाला हाेता़ यंदा काेराेनाचा सर्वाधिक फैलाव पूर्व व दक्षिण झाेनमध्ये झाल्याचे समाेर आले आहे़ या दाेन्ही झाेनमधील परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे़
निर्णय घेण्यास विलंब का?
फेब्रुवारी महिन्यापासूनच पूर्व व दक्षिण झाेनमध्ये काेराेनाचा आलेख वाढला़ या झाेनमध्ये प्रभावी उपाययाेजना राबविण्यासाठी मनपाने जवळपास दाेन महिन्यांचा विलंब का लावला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे़