अकोला : अकोलेकरांची तहान भागविणार्या काटेपूर्णा धरणात जेमतेम जलसाठा शिल्लक असताना, बुधवारी या धरणातून दोन दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला आहे; परंतु हे पाणी निश्चित स्थळी न पोहोचता अध्र्यावरच थांबल्याने खांबोरा पाणीपुरवठा योजनेंतर्गत येणारी ६४ गावे आजमितीस तहानलेलीच आहेत. दरम्यान, मागील वर्षी पाऊस नसल्याने नदीपात्र अगोदरच कोरडेठक आहे. यावर्षीचा उन्हाळाही प्रखर असल्याने हे पाणी खांबोरा-उन्नई बंधार्यापर्यंत पोहोचणे शक्य नसतानाही काटेपूर्णा धरणाचे पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.खांबोरा पाणीपुरवठा योजनेंतर्गत येणार्या ६४ गावांची तहान भागविण्यासाठी बुधवारी सायंकाळी ६ वाजता या धरणातून खांबोरा-उन्नई बंधार्यासाठी दोन दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे; परंतु नदी कोरडी असून, धरणातून सोडलेल्या पाण्याचा प्रवास १८ किलोमीटर लांब आहे. परिणामी बुधवारी सायंकाळी सोडलेले पाणी गुरुवारी सायंकाळपर्यंत २४ तास उलटूनही नऊ किलोमीटर अंतरापर्यतच पोहाचले होते. शुक्रवारी हे पाणी दोनदपर्यंतच पोहोचले. त्यापुढे मात्र पाणी सरकले नाही. दोनद येथील डोहात जवळपास अर्धा दशलक्ष घनमीटर जलसाठा या पाण्यामुळे संचयित झाला आहे. काटेपूर्णा धरणातील सोडलेले दोन दशलक्ष घनमीटर पाणी खांबोरा-उन्नई धरणापर्यंत पोहाचणे अशक्य असताना, अकोलेकरांना संकटात टाकून या पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला आहे. काटेपूर्णा धरणात केवळ ६.८९ दशलक्ष घनमीटर (७.९७ टक्के) जलसाठा शिल्लक होता. आता या धरणात केवळ ४.८९ दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक आहे. दररोज वेगाने होणारे बाष्पीभवन आणि पाण्याचा होणारा अपव्यव बघता, शिल्लक असलेल्या जिवंत जलसाठय़ावर जून महिन्यापर्यंत अकोलेकरांची तहान भागवणे अशक्य आहे.
काटेपूर्णाचे पाणी थांबले अध्र्यावरच!
By admin | Published: May 02, 2016 2:18 AM