अकोला: अकोलेकरांचा लोकोत्सव असलेल्या कावडयात्रा महोत्सवाला सोमवार, दि. ११ सप्टेंबर रोजी शिवभक्तांच्या जल्लोषात सुरूवात झाली. आराध्य दैवत श्री राज-राजेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी कावडधारी शिवभक्त पूर्णेचे जल आणतात. यंदाच्या कावड यात्रा महोत्सवात स्वयंभू भगवान महादेवावर श्रद्धा असलेल्या एका सहा वर्षीय चिमुकल्याने १७ कि.मी. पायी चालीत गांधीग्राम येथून पूर्णेचे जल घेऊन कावड आणल्याचे दिसून आले. राजराजेश्वर नगरीत त्याचे आगमन होताच अनेक भाविकांची त्याचे दर्शन घेत ठिकठिकाणी सत्कार केला.
शहरात श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी कावडसह पालखी यात्रा निघते. शहरातील शेकडो शिवभक्त मंडळांचे कार्यकर्ते भरण्यांची कावड तयार करून गांधीग्राम येथील पूर्णा नदीवर जल आणतात. ८७ वर्षांपासून कावडची परंपरा आजही कायम असून, श्री राजराजेश्वरावर भाविकांची श्रद्धा आहे. शहरातील संत कबीर नगर, आपातापा रोड येथील रहिवासी विदीत इंगोले (वय ६ वर्ष) या शिवभक्ताने थेट पायात चप्पल न घालता १७ कि.मी. दुर असलेल्या गांधीग्राम येथून पूर्णा नदीचे जल अभिषकेसाठी आणल्याचे दिसून आले. त्याचे आगमन शहरात होताच ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. काही भाविकांनी तर चक्क विदीतचे दर्शन घेतल्याचे पहावयास मिळाले. स्वयंभू भगवान महादेवावर श्रद्धा असल्याचे त्याने ‘लोकमत’ला सांगितले. याप्रसंगी त्याच्यासोबत आजोबा रमेश रामकृष्ण इंगोले हे होते.