अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत राबविण्यात येणाऱ्या जिल्हा गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत कायाकल्प अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत राज्य शासनातर्फे अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालय व बाळापूर ग्रामीण रुग्णालयाला ‘कायाकल्प पुरस्कार- २०१८-१९’ जाहीर करण्यात आला आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत आरोग्य विभागात कायाकल्प पुरस्कार योजना राबविण्यात येते. यामध्ये रुग्णालय देखभाल, स्वच्छता, पुरक सेवा, जैविक कचरा व्यवस्थापन, संसर्ग नियंत्रण, स्वच्छता प्रोत्साहन असे सहा निकष लावण्यात येतात. जिल्हा व राज्यस्तरावरील पथकाद्वारे जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला व बाळापूर ग्रामीण रुग्णालयाची तीन स्तरावर पाहणी करण्यात आली. त्यानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांनी दोन्ही जिल्हा स्त्री रुग्णालय व बाळापूर ग्रामीण रुग्णालयाला कायाकल्प पुरस्कार घोषित केला. जिल्हा गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम, कार्याकल्प कार्यक्रम २०१८-१९ साठी जिल्हा स्त्री रुग्णालयाला तीन लाख, तर बाळापूर ग्रामीण रुग्णालयाला एक लाख रुपये असा निधी पुरस्कार म्हणून राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून दिला जाणार आहे. या पुरस्कारासाठी जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल, बाळापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बुलबुले तसेच वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुकर राठोड, प्रशांत ठाकरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक व डॉ. उत्पला देशभ्रतार, जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक यांनी दोन्ही रुग्णालयांना मार्गदर्शन केले.