लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘स्वच्छता हीच सेवा’ या मोहिमेंतर्गत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी सकाळी टिळक रोड येथील मंगलदास मार्केट परिसरात स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. स्वत: हातात झाडू घेऊन कचरा साफ केला. जनतेने आपल्या परिसराबरोबरच गाव, शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.या मोहिमेत नगरसेवक, मनपा आयुक्त अजय लहाने, उपायुक्त समाधान सोळंके आदींसह मोठय़ा संख्येने नागरिक सहभागी झाले होते. पालकमंत्री म्हणाले, की निरोगी जीवनासाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. पंतप्रधानांनी गेल्या तीन वर्षात स्वच्छ भारताचा संदेश दिला. स्वच्छता हीच सेवा ही मोहीम २ ऑक्टोबरपयर्ंत राबविण्याचे त्यांनी सूचित केल्यानंतर राज्य शासनाने ही मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्याचे निश्चित केले. त्या अनुषंगाने आपला जिल्हा स्वच्छ करण्यासाठी प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छतेचा संकल्प करणे गरजेचे आहे. गाव पातळीवरदेखील या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून, स्वच्छतेबरोबरच वैयक्तिक शौचालय वापरण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. मार्च-२0१८ पयर्ंत जिल्हा संपूर्णपणे हगणदरीमुक्त करण्यात येईल. लोकांनीदेखील मोठय़ा प्रमाणात स्वच्छता अभियानाच्या या चळवळीत सहभागी होऊन आपल्या घराप्रमाणेच आपला परिसर, आपले गाव, आपले शहर स्वच्छ ठेवावे, असे आवाहन पालकमंत्री यांनी यावेळी केले.
नागरिकांशी साधला संवादयानंतर पालकमंत्री डॉ. पाटील यांनी शहरातील तारफैल भागाला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधून शौचालयाची पाहणी केली. चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येक घरात शौचालय असणे गरजेचे आहे. ज्यांच्याकडे शौचालय नाहीत, त्यांनी तत्काळ शौचालय बांधावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तारफैल भागातील सार्वजनिक शौचालयांचीदेखील त्यांनी पाहणी करून जनतेच्या अडचणी जाणून घेतल्या. स्वच्छतेबाबतच्या अडचणी तातडीने सोडवण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकार्यांना सूचनाही दिल्या.
मोहिमेचा घेतला आढावासदर कार्यक्रमानंतर पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘स्वच्छता हीच सेवा’ या मोहिमेचा सविस्तरपणे आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, मनपा आयुक्त अजय लहाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विलास खिल्लारे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे आदींसह सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.