अकोला: खरीप हंगामात पेरणीसाठी जिल्हय़ातील शेतकर्यांना बियाणे व खतांची कमतरता भासणार नाही, यासाठी योग्य नियोजन करण्याचे सांगत, बियाण्याचा काळा बाजार होऊ नये, यासाठी भरारी पथके गठित करून विशेष लक्ष ठेवा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी कृषी विभागाला दिले.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनातील छत्रपती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार बळीराम सिरस्कार, आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, विभागीय कृषी सहसंचालक एस.आर.सरदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र निकम, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ.प्रदीप इंगोले प्रामुख्याने उपस्थित होते. यावर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्याने, खरीप हंगामात सोयाबीन, कपाशी, तूर व मूग पिकाच्या क्षेत्रात वाढ होऊ शकते. या पृष्ठभूमीवर पेरणीकरिता शेतकर्यांना बी-बियाणे व खतांची कमतरता पडू नये, यासाठी कृषी विभागाने योग्य नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. पाऊस वेळेवर आल्यास कपाशी बियाण्याची मागणी वाढणार आहे, त्यासाठी महाबीज व इतर संबंधित नोडल संस्थांकडून कपाशीचे बियाणे उपलब्ध करण्याबाबत नियोजन करण्यात यावे. बियाण्याचा काळाबाजार होऊ, यासाठी विशेष भरारी पथके निर्माण करण्यात यावी आणि जिल्हय़ातील कृषी सेवा केंद्रांनी बियाणे व खताच्या उपलब्धतेची माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावण्याचे निर्देश देत बोगस बियाण्याची विक्री होणार नाही, याकडे कृषी विभागासह जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ.पाटील यांनी दिले.
बियाण्यांच्या काळय़ा बाजारावर लक्ष ठेवा!
By admin | Published: April 11, 2017 1:54 AM