अकोला : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या कामाचा आढावा घेत, होमक्वारंटइन केलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवून, बाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी शुक्रवारी दिले. ‘ होम क्वारंटाइन’ची व्यवस्था नसलेल्या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. लग्न समारंभावर लक्ष ठेवून नियमाचे उल्लघंन करणाऱ्यांवर कार्यवाही करावी. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
थेट संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची
दर महिन्याला कोविड चाचणी करा!
जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाजीपाला विक्रेते, दूध विक्रेते, किराणा व्यावसायिक व किरकोळ दुकानदार अशा थेट संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची दर महिन्याला कोविड चाचणी करण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
चाचण्या पूर्ण करून आठवडी
बाजार सुरू करण्याचे नियोजन करा!
जिल्ह्यात सद्य:स्थितीत आठवडी बाजार बंद आहेत; परंतु भविष्यात आठवडी बाजार सुरू करण्याबाबत नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी बाजारात येणाऱ्या दुकानदार व व्यापाऱ्यांच्या कोरोना चाचण्या पूर्ण करून, जिल्ह्यातील आठवडी बाजार सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
कायदा व सुव्यवस्थेचा घेतला आढावा!
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. जिल्ह्यात सुरू असलेली अवैध दारू विक्री नियंत्रणात आणण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले. पोलीस स्टेशनमध्ये वाचनालय व व्यायाम शाळा असणे गरजेचे असून, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या, तसेच मनपा व पोलीस विभागाने संयुक्त कार्यवाही करून भिकारीमुक्त शहर ही योजना राबविण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले.
.........................फोटो......................