अकोला : कोरोनाचे संकट अधिक गडद होत असल्याने तसेच हा आजार लपविण्याची शक्यता असल्यामुळे मेडिकलमध्ये सर्दी, ताप, खोकला व निमोनिया या आजारासंबंधित औषधे खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांचे नाव, मोबाइल नंबर व पत्ता नमूद करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने देण्यात आले आहेत. तसे न केल्यास मेडिकल सील करण्याचा इशारा देण्यात आला आहे.शहरात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढताहेत, हे विचारात घेऊन अनेक नागरिक आजार लपवून परस्पर मेडिकलमधून सर्दी, ताप, खोकला व निमोनिया यांसारख्या आजाराची औषधे घेऊन जात आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय असे औषध घेणे या काळात चुकीचे आहे. त्यामुळे मेडिकल संचालकांना औषध प्रशासनाने संहिता आखून दिली आहे. या सहितेनुसारच औषधांची विक्री करावी. औषध घेण्यासाठी आलेल्यांचे डिटेल्स घ्यावेत व डिटेल्स दररोज अन्न व औषध प्रशासनाच्या वेबसाईटवर टाकावे, असेही आदेशात नमूद केले आहे, तसेच मेडिकल दुकानांमध्ये औषधे देणाऱ्यांना मास्क वापरणे बंधनकारक आहे, तसेच ग्लोव्हज न वापरता औषधे देऊ नयेत, औषधांना हात लावू नये तसेच विना मास्क घातलेले औषध खरेदी करण्यासाठी आल्यास त्यांनासुद्धा औषधे देऊ नये, असेही आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासन विभागाने दिलेल्या आहेत.