अकोला : उष्माघातापासून बचावासाठी दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे उद्भवणा-या परिणामांमुळे मानव, पशु व शेतीपिकांवर होणारे दुष्परिमाण टाळण्याच्या दृष्टीने सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार १ मार्च ते १५ जून हा उष्णतेची लाट व्यवस्थापन कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काय करावे?
पातळ, सच्छिद्र, सुती कपडे वापरावे. तहान नसली तरी जास्तीत जास्त पाणी प्यावे. बाहेर पडताना गॉगल्स, छत्री, टोपी वापरावी. उन्हाळ्यात काम करताना डोक्यावर टोपी, रूमाल, दुपट्टा वापरावा. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास लिंबूपाणी, ताक, सरबत, ओआरएस आदींचा नियमित वापर करावा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम अशी लक्षणे व चक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पशुधन व पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावे, तसेच पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. कामाच्या ठिकाणी थंड पेयजलाची व्यवस्था असावी. गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी.
काय करू नये?
लहान मुलांना दार बंद असलेल्या किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी १२.३० ते ३.३० या कालावधित उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कापड घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करणे टाळावे व स्वयंपाकघराची दारे, खिडक्या उघड्या ठेवाव्यात. चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक, मद्यसेवन टाळावे. उन्हात वाहने शक्यतो चालवू नये. ज्वलनशील पदार्थांपासून दूर राहावे.