- अनिल गवई
खामगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या हद्दीत अतिक्रमण केल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन विकासकांना नोटीस बजावल्या आहेत. ले-आऊटसाठी केलेले मोऱ्यांचे बांधकाम आणि विद्युत खांब काढून घेण्याच्या निर्देशामुळे विकासकांचे धाबे दणाणले आहे.
खामगाव शहरापासून नजीकच असलेल्या जलंब रोडवरील कोक्ता शिवारात खामगाव येथील विकासकांकडून नव्यानेच ले-आऊट विकसीत करण्यात आले. या ले-आऊटसाठी विद्युत खांबे आणि मोऱ्यांचे बांधकामही करण्यात आले. तसेच विकसीत ले-आऊटमधील खुल्या भुखंडांच्या विक्रीसही प्रारंभ करण्यात आला. दरम्यान, ले-आऊटसाठी करण्यात आलेले हे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खामगाव रस्त्याच्या रस्त्याच्या हद्दीत करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. परिणामी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग खामगावच्यावतीने खामगाव येथील प्रदीप राठी यांना अतिक्रमण केल्याची नोटीस बजावली आहे. सदर अतिक्रमण तात्काळ न काढल्यास, अतिक्रमण केलेले साहित्य आणि अतिक्रमण काढण्यासाठी होणारा खर्च वसूल करण्याचेही नोटीसमध्ये नमूद केले आहे. राठी यांच्या प्रमाणेच वाडी गावाजवळ टीन शेडचे आवार करून अतिक्रमण केल्याप्रकरणी स्वामीकृपा डेव्हलपर्स, खामगाव यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने विकासकांना नोटीस दिल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, मुख्य रस्त्या लगत अतिक्रमण करून भुखंड विक्री करणाºया विकासकांचे धाबे दणाणले आहे.
सूचनेकडे विकासकांचे दुर्लक्ष!
कोक्ता शिवारात खामगाव येथील विकासकांकडून अतिक्रमण सुरू असताना मोजमाप करून सार्वजनिक बांधकाम उपविभाग खामगावतंर्गत तोंडी सूचना दिल्या होत्या. त्यावेळी ले-आऊटचे प्रगतीपथावरील कामही बंद पाडले होते. मात्र, तरी देखील अतिक्रमण केल्याचेही सहाअभियंता सार्वजनिक बांधकाम यांनी नोटीसमध्ये नमूद केले आहे.
ले-आऊट विकसीत करताना कोणतेही अतिक्रमण केलेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाची नोटीस प्राप्त झाली आहे. रस्त्यांकडील मोºयांचे बांधकाम आणि विद्युत खांब आपण काढून घेणार आहोत.
- प्रदीप राठी, खामगाव.