खामगाव : आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी खामगाव येथून पंढरपूरकडे जाणारी विठ्ठल दर्शन एक्स्प्रेस यावर्षीही ९ जुलैपासून पंढरपूर येथे जाणार आहे. यावर्षीही खामगाव येथून या एक्स्प्रेसच्या चार फेर्या होणार आहेत. तसेच पंढरपूर येथून परतीच्या सुद्धा चार फेर्या होणार आहेत. महाराष्ट्राचे कुलदैवत पंढरपूर येथील विठ्ठलाचे दर्शनासाठी आषाढी वारीकरिता दरवर्षी खामगाव व परिसरातील विठ्ठल भक्त पंढरपूर येथे जात असतात. हजारोंच्या संख्येत असलेली ही भाविक वारकर्यांची संख्या पाहता भाविकांचा प्रवास सुविधाजनक व्हावा, यासाठी रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रयत्नातून ही स्पेशल एक्स्प्रेस सुरु करण्यात आली आहे. यावर्षीही रेल्वे प्रशासनाकडून या विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसला हिरवी झेंडी मिळाली असून, यावर्षी खामगाव येथून या एक्स्प्रेसच्या चार फेर्या होणार आहेत. यामध्ये पहिली फेरी ९ जुलै, दुसरी फेरी १0 जुलै, तिसरी फेरी १२ जुलै तर चौथी फेरी १३ जुलै रोजी खामगाव येथून रवाना होणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी पंढरपूर ते खामगाव, अशा विठ्ठल दर्शन एक्स्प्रेस च्या चार फेर्या होणार आहेत. यामध्ये पहिली फेरी १0 जुलै, दुसरी ११ जुलै, तिसरी फेरी १६ जुलै तर शेवटची चौथी फेरी १७ रोजी होणार आहे. या एक्सप्रेससाठीचे आरक्षण ७ जुलैपासून सुरु होणार आहे.
शनिवारपासून खामगाव-पंढरपूर ‘विठ्ठल दर्शन’ एक्स्प्रेस
By admin | Published: July 07, 2016 2:42 AM