अकोला : शहरातील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये येत असलेल्या खरप बु. परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. रविवारी दुपारच्या सुमारास आलेल्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर तब्बल २४ तासांनंतर सोमवारी दुपारच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाला. उन्हाळ्याच्या दिवसांत वाढत्या तापमानात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक उकाड्याने त्रस्त झाले होते.
खरप बु. परिसरात गत चार ते पाच दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. तसेच विद्युत रोहित्रावरील फेज उडणे, तांत्रिक बिघाड होणे, केबल खराब होणे, कमी दाबाचा वीजपुरवठा होणे असे प्रकार वाढले आहेत. शहरात वाढीव क्षेत्रात खरप बु.चा समावेश झाल्याने या परिसरात विकास होण्याची आशा नागरिकांना होती, मात्र तसे न झाल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. महावितरणकडून तांत्रिक अडचणीच्या नावाखाली वीजपुरवठा वारंवार खंडित केला जात असल्याने नागरिक वैतागले आहेत. याबाबत कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कर्मचाऱ्यांना फोन उचलण्याची ॲलर्जी असल्याचे दिसून येत आहे. याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन खरप बु. परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.