अकोला, दि. १२- खरीप हंगामात पिकांसाठी लागणार्या खतांचा वापर बराच घटला आहे. जिल्ह्यात प्राप्त झालेल्या एकूण साठय़ापैकी केवळ ७२ टक्केच खतांची विक्री झाली आहे. २८ टक्के साठा गोदामातच पडून आहे. त्यामुळे वापर कमी होण्याच्या कारणांचा शोध उत्पादक कंपन्या घेत आहेत. त्यातच आता रब्बी हंगामासाठी मागणीच्या ६५ टक्केच खत देण्याला शासनाने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात खरिपासाठी सप्टेंबर अखेरपर्यंंत विविध खतांचा ६७0८५ मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला. त्यामध्ये गेल्यावर्षीचा शिल्लक १५३७२ मे.टन मिळून एकूण ८२४५७ मे.टन साठा झाला. त्यापैकी आतापर्यंत ५९७५८ मे.टन खतांची विक्री झाली. एकूण उपलब्ध साठय़ाशी हे प्रमाण ७२ टक्के आहे. २८ टक्के खते गोदामातच पडून आहेत. म्हणजे, २२६६९ मे.टन खतांची उचलच झालेली नाही. रासायनिक खते उत्पादक कंपन्यांसाठी ही बाब चिंतेची झाली आहे. गेल्या यापूर्वी हंगामात खतांसाठी शेतकर्यांची कमालीची धावपळ व्हायची. काही वेळा तर पोलीस बंदोबस्तात खतांची विक्री करण्याची वेळ आली होती. त्यानंतर शेतकर्यांच्या थेट बांधावर खते देण्याचा निर्णयही शासनाला घ्यावा लागला होता. या परिस्थितीत चालू वर्षात खतांच्या वापराचे प्रमाण कमालीचे घटले. खतांच्या समतोल वापरासाठी शेतकर्यांना जागरुक केले जात आहे. माती परीक्षणामुळे त्या शेतात आवश्यक घटक असलेली खतेच दिली जात आहे. यामुळे काही प्रमाणात खत वापरामध्ये र्मयादा आल्या आहे. त्यासाठी शेतकर्यांची जागरुकता वाढण्याची गरज आहे. आरसीएफकडून त्यासाठी किसान सुविधा केंद्र सुरू केली जात आहेत. - सतीश वाघोडे, उपप्रबंधक, आरसीएफ, अकोला विभाग.
खरिपाचा २८ टक्के खत साठा गोदामातच!
By admin | Published: October 13, 2016 3:07 AM