जिल्हयातील ६२ हजार शेतकऱ्यांना ५७१ कोटी रुपयांचे कर्ज वाटप अकोला: पावसाळा सुरु झाला असून, खरीप हंगामातील पेरण्या ताेंडावर आल्या असल्या तरी, खरीप हंगामासाठी ११ जूनपर्यंत जिल्हयात ६२ हजार ३८१ शेतकऱ्यांना ५७१ कोटी ३६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असून, जिल्हयातील उर्वरित ८० हजार ११९ शेतकरी अद्याप पीक कर्जाच्या प्रतिक्षेत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे कोरोना काळात आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हयातील १ लाख ४२ हजार ५०० शेतकऱ्यांना १ हजार १४० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले आहे. त्यानुषंगाने गत १ एप्रिलपासून जिल्हयातील राष्ट्रीयकृत बॅंकांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकमार्फत पीक कर्जाचे वाटप सुरु करण्यात आले. परंतू पावसाळा सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर आल्या असून, जिल्हयातील शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरु केली असताना, पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ११ जूनपर्यंत जिल्हयात ६२ हजार ३८१ शेतकऱ्यांना ५७१ कोटी ३६ लाख रुपये पीक कर्जाचे बॅंकांमार्फत करण्यात आले असले तरी, जिल्हयातील उर्वरित ८० हजार ११९ शेतकरी अद्यापही पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थितीत जिल्हयातील शेतकरी आधीच संकटात सापडला असताना, पीक कर्जाच्या प्रतिक्षेत असलेल्या जिल्हयातील शेतकऱ्यांना खरीप पेरणीपूर्वी पीक कर्जाचा लाभ मिळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पेरणीचा खर्च भागविण्याची शेतकऱ्यांना चिंता !
खरीप हंगामातील पेरणी तोंडावर आली असताना, पीक कर्ज अद्याप मिळाले नसल्याने, पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते आणि पेरणीचा खर्च कसा भागविणार, याबाबतची चिंता शेतकऱ्यांना सतावत असल्याचे चित्र आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हयातील पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरु आहे. ११ जूनपर्यंत जिल्हयातील ६२ हजार ३८१ शेतकऱ्यांना ५७१ कोटी ३६ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निर्देश बॅंकांना देण्यात आले आहेत.
आलोक तारेणीया, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक, अकोला.