महाराष्ट्र सरकारने कोरोनाचे नाव पुढे करून एक वर्षापासून धार्मिक कार्यक्रम बंद केले आहे. मागील काही काळात सर्व वारकरी संघटनांनी आपापल्या परीने आंदोलन केले व गेल्या एक महिन्यापासून धार्मिक कार्यक्रम नियम पाळून चालू झाले होते. पण पुन्हा कोरोनाची लाट आली, असे कारण सांगून धार्मिक कार्यक्रम बंद करण्यात आले. देशी दारूचे दुकान, मॉल, चित्रपटगृह, राजकीय मीटिंग, राजकीय मोर्चे हे सर्व चालू असताना केवळ धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आणणे योग्य नाही. नियमावली देऊन कार्यक्रम सुरू करू शकता. सध्या उत्तराखंडमध्ये हरिद्वारला कुंभमेळ्यामध्ये लाखो भाविक उपस्थित आहेत. वृंदावनमध्ये कुंभमेळ्यात लाखो भाविक आहेत. उत्तर प्रदेशमध्ये काशी, अयोध्या क्षेत्रात भाविकांना कोणतेही बंधन नाही, गुजरातमध्ये द्वारकेला, सोरटी सोमनाथला कोणतेही बंधन नाही. महाराष्ट्रातील भाविक भारतातील सर्व राज्यांमध्ये मोठ्या संख्येने दर्शनाला जात आहेत. इतर कोणत्याही राज्यात धार्मिक कार्यक्रमांवर बंदी नाही. मग महाराष्ट्रातच धार्मिक कार्यक्रमावर का, असा सवाल आज विश्व वारकरी सेनेच्यावतीने अकोटचे तहसीलदार निलेश मडके व अकोट ग्रामीण पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे. हे निवेदन अकोट तहसील कार्यालय येथे विश्व वारकरी सेना संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी हभप विठ्ठल महाराज साबळे, विश्व वारकरी सेना महाराष्ट्र अध्यक्ष श्रीधर महाराज पातोंड, रतन महाराज वसु, श्रीधर महाराज तळेकर, ज्ञानेश्वर महाराज पातोंड, वैभव महाराज वसु, सोपान महाराज ऊकर्डे, विक्रम महाराज शेटे, अमोल महाराज कुलट, ज्ञानेश्वर महाराज भुस्कट, विठ्ठल महाराज खलोकार, ओंकार महाराज टौलारे, पुरुषोत्तम महाराज नेमाडे, गजानन मोडक, गजानन फुंडकर, निखिल भाऊ गावंडे यांची उपस्थिती होती.
खुशाल गुन्हे दाखल करा, पण धार्मिक कार्यक्रम बंद करणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:18 AM