एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या एका युवतीचे जानेवारी २०२० मध्ये अपहरण करण्यात आले होते. तेव्हापासून ही युवती बेपत्ता होती. या प्रकरणाची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात केल्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३, ३६६, नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला ; मात्र एमआयडीसी पोलिसांना युवतीचा शोध लागेना. अशा गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी अनैतिक मानवी वाहतूक कक्ष स्थापन केला असून या कक्षाकडे या प्रकरणाचा तपास आला. त्यानंतर या कक्षाचे प्रमुख संजीव राऊत व महेश गावडे यांनी तातडीने तपास सुरू केला. युवतीची सखोल चौकशी केली असता ती अकोट येथील एका ठिकाणी असल्याची माहिती मिळाली. यावरून अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने या युवतीची शुक्रवारी रात्री अकोट येथून सुटका केली. तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यासाठी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडे पोलीस ठाण्यात महिला व बालकांच्या संदर्भात प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांचा तपास वर्ग करण्यात येत आहे. त्यानंतर या कक्षाकडून अशा प्रकरणांचा छडा लावण्यात येत आहे. आतापर्यंत चार ते पाच मुलींना शोधण्यात या कक्षाला यश आले आहे. यावरून अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने बालक व महिलांच्या सुरक्षेसाठी मोठी कामगिरी केल्याचे दिसून येत आहे.
अपहरण केलेल्या युवतीची १५ महिन्यानंतर सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 4:17 AM