अमरावती जिल्ह्यातील एका गावातील २२ वर्षीय युवती ही शेगाव येथे बहिणीकडे गेली होती. शेगावहून अकोटमार्गे परत येत असताना, अकोट शहरात तिचे अपहरण करण्यात आल्याच्या घटनेला सुरुवात झाली. अपहरण झाल्याची भन्नाट स्टोरी तयार करून प्रेमविवाह होईपर्यंत कसेकसे अपहरण झाले, अपहरण करणारे कोण आदीबाबत मोबाइलद्वारे संदेश पाठवून युवतीने कुंटुब व पोलिसांचे लक्ष विचलित केले.अपहरण झाल्याने शेगाव पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली. शेगावपासून एक महिला युवतीवर लक्ष ठेवून होती. तिने अपहरण अकोटमधून केल्याचे संदेश पाठविल्याने अकोट शहर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत, युवतीचा शोध घेण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले. मोबाइल लोकेशन, संदेशाची तपासणी, सायबर क्राइमकडून सीडीआर आदी माहिती गोळा करण्यासाठी शहर पोलिसांची दमछाक सुरू होती. मोबाइल लोकेशनवरून पोलीस युवतीच्या मागावर होते. सोशल मीडियावर युवतीचे फोटो व्हायरल झाले. तिला शोधण्यासाठी आवाहन करण्यात आले.समाजमाध्यमेही कामाला लागली. तेवढ्यात पथ्रोट येथील आर्यसमाज मंदिरात या युवतीने अकोट तालुक्यातील एका गावातील २६ वर्षीय युवकासोबंत प्रेमविवाह केल्याची माहिती समोर आली. अकोला-अमरावती-बुलडाणा पोलीस या सैराट कहाणीमधील युवतीला गंभीरतेने शोधण्यासाठी जिवाचे रान करीत होते, परंतु त्या युवतीने आपल्या प्रियकरासोबत प्रेमविवाह केल्याचे उघडकीस आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.
बहिणीच्या घरातून परतताना तरुणीचं अपहरण; पोलीस लागले कामाला अन् समोर आला भलताच प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 4:23 AM