खेट्री : पातूर तालुक्यातील चतारी येथे किडनीच्या आजारामुळे मृत्यूचे तांडव थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. चतारी येथील बळीराम गणपत टेवाळे (७०) या वृद्धाचा किडनीच्या आजाराने मंगळवारी ३० मार्च रोजीच्या सायंकाळी मृत्यू झाला आहे. गेल्या २०१० पासून किडनीच्या आजाराने मृत्यूचे सत्र सुरूच असून, दहा वर्षांमध्ये किडनीच्या आजाराने जवळपास २५ जणांचा मृत्यू झाला आहे, तसेच ५० च्या वर किडनीग्रस्त उपचार घेत आहेत. चतारी येथे पाणी पिण्यायोग्य नसल्याच्या प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार निष्पन्न झाले होते. पाण्यामुळेच किडनीच्या आजाराने थैमान घातले आहे. अनेकांना किडनी विकाराची लागण झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बळीराम गणपत टेवाळे यांना गेल्या काही वर्षांपासून किडनीचा विकार झाला होता. त्यांच्या किडन्या निकामी झाल्यामुळे त्यांच्यावर वेगवेगळ्या शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले; परंतु अखेर केलेले प्रयत्न यशस्वी न झाल्याने त्यांचा ३० मार्च रोजी मृत्यू झाला. ग्रामस्थांनी शासन-प्रशासन आरोग्य विभाग व मंत्रालयापर्यंत ठोस उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र, अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.
बॉक्स
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जाताहेत बळी
चतारी येथे किडनीच्या आजाराने दहा वर्षांत जवळपास २५ बळी गेल्यावरही आरोग्य विभाग व प्रशासन झोपेतच असल्याचे चित्र आहे. गावात एखादा बळी गेल्यानंतर आरोग्य पथक दिखाव्यासाठी सर्वेक्षण करून रुग्णांची तपासणी करते; परंतु ठोस उपाययोजनेकडे दुर्लक्ष केले जाते.
मृत्यूच्या संख्येत सतत होतेय वाढ
२०२० वर्षाच्या मार्च महिन्यामध्ये आरोग्य विभागाने चतारी येथे केलेल्या सर्वेक्षणात ३५ जण किडनीच्या आजारावर उपचार घेत असल्याचे समोर आले होते. यावर्षी किडनीग्रस्तांचा आकडा वाढून पन्नासच्या वर गेल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बॉक्स
जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन हवेत विरले
चतारी येथे किडनीच्या आजाराने मृत्यूचे सत्र सुरूच असून, यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्या २०२० च्या मार्च महिन्यामध्ये प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी ठोस उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावेळी ग्रामस्थांना दिले होते; परंतु अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन हवेतच विरल्याने गावात नाराजीचा सूर उमटत आहे.