संग्रामपूर (जि. बुलडाणा): तालुक्यातील वरवट खंडेराव येथील एका ४२ वर्षीय व्यक्तीचा किडनीच्या आजारामुळे मृत्यू झाल्याची घटना १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १ वाजेदरम्यान घडली. अनंत श्रीराम गाळकर (४२) असे मृतकाचे नाव असून, त्यांच्यावर एक महिन्यापासून अकोला येथे उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांना १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री अत्यवस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या नातेवाइकांनी अकोला येथे उपचाराकरिता नेले; परंतु दवाखान्यात पोहचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ असा बराच आप्त परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. तालुक्यात एकापाठोपाठ किडनीच्या आजारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतच असून, दोनच दिवसात किडनीच्या आजारामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. या आधी बोडखा येथील विजय शालीग्राम गवई (३५) या व्यक्तीचासुद्धा १३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री किडनीच्या आजारामुळे मृत्यू झाला आहे. किडनीच्या आजारामुळे मृत्यूचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात ४ ते ५ रुग्ण किडनीच्या आजारामुळे ग्रासले आहेत. तालुक्यातील क्षारयुक्त पाणी पिल्यामुळे नागरिकांना व लहान बालकांनासुद्धा किडनीच्या आजाराची लागण होत असून, त्यांच्यावर वेळेवर उपचार न झाल्यास त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. क्षारयुक्त पाणी तालुक्यातील नागरिकांसाठी जहर पिण्यासारखे होत आहे; परंतु पर्याय नसल्यामुळे नागरिकांना क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे.
किडनीच्या आजाराने इसमाचा मृत्यू
By admin | Published: February 17, 2016 2:12 AM